दुकानदारांनो, नियम पाळा नाहीतर होणार कारवाई; महापालिका आयुक्तांनी काढले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

नागरिक आणि व्यापाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. या संबंधी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी (ता.१६) आदेश काढले आहेत. 

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सुरक्षा नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर गुरुवारपासून (ता.१७) कारवाई करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयानिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकांना दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. 

मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडने पेटवली 'मशाल'!

दुकाने, बाजारपेठा येथे येत असलेले नागरिक हे मास्क वापरत नाहीत, सामाजिक अंतर ठेवत नाहीत, तसेच व्यापारीही त्यांच्या दुकानाच्या परिसरात सॅनिटाईजेशन करत नाहीत, ग्राहकांना अंतर राखण्याविषयी सूचना देत नाहीत, असे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा नागरिक आणि व्यापाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. या संबंधी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी (ता.१६) आदेश काढले आहेत. 

जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर!​ 

यासाठी अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण तीन कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार १५ पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकांमार्फत रोजच्या रोज केल्या जाणाऱ्या कारवाईचा अहवाल संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी उपआयुक्त (परिमंडळ) यांच्यामार्फत आयुक्तांकडे सादर करावा, असेही या आदेशात म्हटले आहे. 

होम क्वॉरंटाईन असलेल्या कोरोना रुग्णाने केली आत्महत्या; पुण्यात घडली घटना

सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने या आधीच कारवाईला सुरूवात केली आहे. मास्क न वापरणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर ही कारवाई होत होती. मात्र आता दुकानात होणारी गर्दी, त्याठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन न होणे, ठराविक वेळेने केले जाणारे सॅनिटायझेशन, तसेच सॅनिटायझरची दुकानातील उपलब्धता, ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवून उभे राहण्यासाठी केलेले मार्किंग या सगळ्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुरुवारपासून कारवाईला सुरूवात होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC decided to take action against shopkeepers who do not follow safety rules regarding corona