पीएमपी प्रवाशांनो महिलांच्या जागेवर बसू नका, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी पीएमपी प्रशासनाने बसमधील डावी रांग महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पुणे : पीएमपी बसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूची रांग राखीव ठेवण्यात आलेली आहे. मात्र, पुरुष प्रवासी नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बसमधील महिला प्रवाशांना अनेकदा उभा राहून प्रवास करावा लागतो. यावर उपाय म्हणून पीएमपी प्रशासनाने महिलांच्या राखीव जागेवर बसलेल्या पुरुषाने उठण्यास नकार दिल्यास बस थेट पोलिस ठाण्यात नेण्याचे आदेश दिले आहेत. 

महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी पीएमपी प्रशासनाने बसमधील डावी रांग महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, अनेक पुरुष प्रवासी या नियमाकडे काणाडोळा करताना पाहावयास मिळतात. अनेकदा महिला प्रवाशांनी विनंती करूनही राखीव जागेवरून उठण्यास नकार दिल्याच्या घटनाही घडतात.

- दिवाळीनंतरही वेळेत मिळेना सिलिंडर

परिणामी, महिलांना गर्दीमध्ये उभा राहून प्रवास करावा लागतो. सद्य:स्थितीत शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपी बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश बसला प्रवाशांची गर्दी असते. अशा परिस्थितीत महिलांना मोठी अडचण सहन करावी लागते. यामुळे महिलांना जागा उपलब्ध व्हावी, यासाठी डाव्या रांगेवर पुरुष प्रवासी बसल्यास त्यांना उठविण्याच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या आहेत.

- महाराष्ट्राच्या राजकारणात 'कहानी में ट्विस्ट'; शरद पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

विनंती करूनही पुरुष प्रवासी आरक्षित जागेवरून न उठल्यास संबंधित बस पोलिस ठाण्यात नेऊन संबंधितावर पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश पीएमपी प्रशासनाने वाहक आणि चालकांना दिला आहे. दरम्यान, अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागांवरही अन्य प्रवाशांना बसू देऊ नये, अशीही सूचना देण्यात आली आहे.

- राणीचा 'तो' गोल अन् महिला हॉकी संघाला मिळालं टोकियो ऑलिंपिकचं तिकीट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP administration has implemented a new rule for male and female passengers