Lockdown : घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरा, नाहीतर... : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

पुणे महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाविरुद्ध वस्ती मित्र हेल्पलाईन (मुख्यत्वे वस्त्यांमधील नागरीकांसाठी) क्र. 020-25506923 /24/25 अशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहे.

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (ता.८) जारी केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी त्यामध्ये रस्त्यावर, रुग्णालय, सरकारी, खासगी कार्यालय, बाजारपेठांमध्ये प्रत्येक व्यक्तीने 3 प्लाय मास्क किंवा कपड्याचा मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी वैयक्तिक किंवा खासगी वाहनाने प्रवास करताना मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच, कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांनाही चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही.

- Good News : तब्बल ७६ दिवसांनी वुहानने घेतला मोकळा श्‍वास!

सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालय, महापालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मास्क हा वैद्यकीय प्रमाणित मास्क असावा. घरगुती कापडी धुण्यायोग्य मास्क अथवा निर्जंतुकीकरणानंतर नंतर पुन्हा वापरता येईल असे मास्क वापरावेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार पोलिसांकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे.

- Video : 'आम्ही जातो आमच्या गावा'; माकडे निघाली जंगलाकडे!

दरम्यान, पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारी रात्रीपर्यंत 229 झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात 194, सातारा 6, सांगली 26 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागात बुधवारअखेर एकूण 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील 15 आणि सातारा जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात झालेल्या एकूण मृत्यूपैकी एक-दोन अपवाद वगळता इतर ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

मास्क न घातल्यास कारवाई होणार : 

पुणे शहरात रस्त्यावर नागरिकांनी फिरू नये. घरातच सुरक्षित रहावे. तसेच, रस्त्यावर मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. म्हैसेकर यांनी दिला आहे.

- Video : 'आपल्या भविष्यकाळाकडून...'; मुक्ता बर्वे काय सांगतेय ते बघाच!

पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेमार्फ़त उपाययोजना करण्यात येत आहेत. काही भागात संचारबंदी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे 25 दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पुणे महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाविरुद्ध वस्ती मित्र हेल्पलाईन (मुख्यत्वे वस्त्यांमधील नागरीकांसाठी) क्र. 020-25506923 /24/25 अशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Collector issued order about everybody obligated to wear a mask on the face