'पुरंदर'बाबत आता 'मास्टर प्लॅन': जयंत सिन्हा

Jayant Sinha
Jayant Sinha

पुणे - 'पुरंदर विमानतळाबाबत लवकरच एक 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात येईल ! तेथील सुविधा आणि बांधकाम हे जागतिक दर्जाचे असणार आहे. विमानतळाशी असणारी 'कनेक्टिव्हिटी' हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असेल. कुठलाही अंतिम निर्णय घेताना पुढील पन्नास वर्षांचा अंदाज डोळ्यापुढे ठेवण्यात येईल. मुख्य म्हणजे भूमी अधिग्रहण करण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. स्थानिकांच्या विस्थापनाचा प्रश्न नीट हाताळावा लागणार आहे', अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपचे खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, " विमानतळ बनवण्यासोबत त्याच्या आसपासच्या भागाचा विकास हा मुद्दाही डोळ्यापुढे आहे. आताचा काळ हा 'ग्रीन फील्ड' विमानतळ बनवण्याचा. पुरंदरचे विमानतळ त्याच धर्तीवर बनवले जाईल. पुरंदर भविष्यात विकासाचे नवे केंद्र होईल !"

पुण्याच्या लोहगाव विमानतळावर 'रन वे' वाढवण्याचा विचार सुरू. लवकरच त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येईल. याचा फायदा पुण्याहून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे होऊ शकतील. या सगळ्यांसाठी जमीन अधिग्रहण हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नवी 850 विमानं घेणार
'उडान' योजना खूप यशस्वी ठरली आहे. लहान लहान शहरे देखील आता हवाई मार्गांनी जोडले जाऊ लागले आहेत. शिवाय, आता हवाई प्रवास सुद्धा स्वस्त झाला आहे. सर्वसामान्यांना याचा फायदा मिळावा, हा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक ठिकाण विमान वाहतुकीने जोडले जावे, हा आमचा प्रयत्न आहे. देशात सध्या 500 विमाने आहेत. हवाई वाहतूक पाहता नवी 850 विमाने विकत घेण्यात येत आहेत, असे सिन्हा यांनी सांगितले.

एअर इंडिया तर नफ्यात !
आपल्या विमान कंपन्या नफ्यात आहेत. अगदी एअर इंडिया सुद्धा नफ्यात आहे ! शिवाय, डिझेल किमती कमी झाल्याने विमानवाहतुक किफायतशीर झालेली आहे. परिणामी सर्वसामान्य माणसं सुद्धा विमानप्रवास करत आहेत. आज 'हवाई चप्पल'वाले सुद्धा 'हवाई जहाज'मध्ये प्रवास करत आहेत. आम्हाला एअर इंडिया ला 'ग्रेट ग्लोबल एअरलाईन' म्हणून पुढे आणायचे आहे, असे सिन्हा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com