विद्येचं माहेरघर विद्यार्थ्यांशिवाय सुनं, कोरोनाचा असा बसणार फटका

pune university
pune university

पुणे, ता. 23 : पुणे हे विद्येचे माहेरघर. पण कोरोनामुळे शहरातील विद्यादानाच्या क्षेत्रालाही ग्रहण लागले आहे. परराज्ये, अन्य जिल्ह्यांतून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 टक्क्यांनी कमी होणार असल्याने शिक्षण संस्थांचे आर्थिक गणितही बिघडणार आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे. त्यामुळे या शहरांमधील शिक्षण व्यवस्थेला त्याचा प्रचंड फटका बसणार आहेत. त्याचा दुष्परिणाम पुढील एक-दोन वर्ष होत राहतील. यातून मार्ग कसा काढायचा, आर्थिक नियोजन बिघडणार असल्याने त्यातून मार्ग कसा काढायचा, अशी चिंता शिक्षण संस्थाचालकांना लागून राहिली आहे.

फी कशी मिळणार?
पुणे हे तर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या एका शहरात सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये मिळून पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. एकूण विद्यार्थी संख्येच्या सुमारे 30 टक्के विद्यार्थी हे परदेश, दिल्ली इतर राज्ये तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून अभियांत्रिकी, मेडिकल, पदवी, एमबीएसह पदव्युत्तर पदवी आदी अभ्यासक्रमांसाठी पुण्यात येतात. या शहरातील कोरोनाची स्थिती पाहिली तर बाहेरून येणारे हे विद्यार्थी पुण्यात येणार नाहीत, असा अंदाज संस्थाचालक व्यक्त करतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थी संख्या एकदम घटल्याने शुल्कातून मिळणाऱ्या रकमेतही मोठी घट होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास सवलतही द्यावी लागणार आहे. त्या तुलनेत खर्च मात्र सुरूच राहणार असल्याने शिक्षण संस्थाचे गणितही कोलमडणार आहे. कोरोनापश्चात शिक्षण क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा विचार करायला संस्थांनी सुरवात केली आहे. वेतन वगळता विस्तार आणि अन्य खर्चात कपात करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. सरकारकडेही काही सवलती देण्यासंबंधी मागणी होऊ लागली आहे. याबरोबर ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्थेशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न देखील केले जात आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी सांगितले, की संस्थेने पाचवी ते पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्याची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागापर्यंत या पद्धतीने शिक्षण देणार आहोत. ज्यांच्याकडे मोबाइल वा लॅपटॉु नाहीत, त्यांना या सुविधा तात्पुरत्या स्वरुपात देण्याचे नियोजन आहे. केवळ विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. फक्त प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांना शाळा-महाविद्यालयात यावे. अन्य अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला जाईल, असे नियोजन केले आहे. विद्यार्थी संख्या घटणार असल्याने आर्थिक फटकाही बसणार आहे. त्यामुळे सरकारने वीज बिल, जीएसटी यात काही सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे.

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कोरोनामुळे मोठी घट होईल. हा आकडा 30 टक्क्यांपर्यंत जाईल. विद्यार्थी त्यांच्या गावी स्थानिक स्तरावर शिक्षण घेतील. यामुळे शहरातील शिक्षण संस्थांपुढे आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. संस्था काही खर्चकपात करतील. पण  सरकारनेही शैक्षणिक सेवांवर आकारल्या जाणारा जीएसटी माफ केला पाहिजे.
- डॉ. विद्या येरवडेकर (प्रधान संचालिका, सिंबायोसिस)

पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20 ते 25 टक्क्यांनी घटेल. स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनदानित संस्था अाणि विद्यापीठांना याचा फटका बसू शकेल. ग्रामीण भागातील आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाल्याने विद्यार्थी एक-दोन वर्षे तरी स्थानिक स्तरावर शिक्षण घेण्यास प्राधान्य देतील.
- डॉ. एन. एस. उमराणी (उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

पुण्यात एकूण 15 विद्यापीठे तर 225 महाविद्यालये आहेत. यात जवळपास 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी गावी परतले असून त्या त्या भागात काही काळ शिक्षण घेण्यास ते प्राधान्य देण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com