सावधान ! पुण्यात रेड ऍलर्ट; 'ही' घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- पुण्याला सतर्कतेचा इशारा  
- पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याने इशारा 

पुणे ः शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 7) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने "रेड ऍलर्ट' दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे शहर आणि त्याच्या जवळील घाटमाथ्यांवर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडला. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र, आता उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात होईल, असा इशारा हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी "सकाळ'ला दिली. ते म्हणाले, "पुण्यात उद्या दिवसभर पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी पडली. मात्र, रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार असून, सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या सरी गुरुवार (ता. 8) पर्यंत सुरू राहतील. शहराच्या जवळ असलेल्या माळशेज, ताम्हिणी घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.'' 

मुळशी, भोर ,वेल्हा अन् मावळ तालुक्यातील शाळांना बुधवारीही सुटी

का वाढणार पाऊस? 
"बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता सातत्याने वाढत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्रावर होईल. त्यामुळे पुण्यात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडेल,'' असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुण्यात उद्यापासून शाळा सुरु पण, काही वर्ग बंद

मराठवाड्यात पावसाची शक्‍यता 
मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचवेळी दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवड्यात पावसाच्या हलक्‍या ते मध्मम सरी हजेरी लावतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही मध्यम ते जोरदार सरी पडतील. 

पुणे, कोल्हापूर, नाशिकला अतिवृष्टीचा; हवामान विभागाचा अंदाज

ही काळजी घ्या 
- आवश्‍यकता असेल तरच घराबाहेर पडा 
- वाहतुकीची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करा 
- पर्यटन स्थळांवर जाणे टाळा 
- महामार्गांवरचा प्रवास टाळा 
- धबधबे, जलाशयात जाण्याचे धाडस टाळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars be Careful! Red Alert for Pune