भरोसा सेलवर वाढला 'भरोसा'; पुणेकरांनी नोंदविल्या प्रतिक्रिया!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

दामिनी पथकाने आत्तापर्यंत सुमारे साडेसात हजार शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. तसेच, 339 जणांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे : बरेच प्रयत्न करूनही पती-पत्नीमधील बेबनाव मिटत नव्हता... परंतु भरोसा सेलमध्ये आल्यानंतर समुपदेशनामुळे वाद संपुष्टात आला, असे विजय जगताप यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक सुलोचना बनसोडे म्हणाल्या, त्यांच्या संपत्तीचा क्‍लिष्ट वाद भरोसा सेलच्या मदतीने निकाली निघाला. तर, अल्पवयीन मुलाच्या पित्याने भरोसा सेलमुळे त्यांच्या मुलाच्या वृत्तीत चांगला बदल झाल्याचा अनुभव व्यक्‍त केला.

- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना शरद पवारांच्या सूचना; म्हणाले...

पोलिस आयुक्‍तालयातील भरोसा सेलच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी त्यांचा भरोसा सेलवरील विश्‍वास वाढल्याचा अनुभव व्यक्‍त केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिका अरुणा ढेरे आणि भारतीय कबड्डी संघाच्या उपकर्णधार दिपीका जोसेफ उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी भरोसा सेलच्या कामाचे कौतुक केले.

- सचिन-विराट पाठोपाठ 'या' खेळाडूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध!

पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त बच्चन सिंह, सहायक आयुक्‍त विजय चौधरी, भरोसा सेलमधील महिला सहाय्य कक्षाच्या पोलिस निरीक्षक विजया कारंडे, विशेष बालसुरक्षा पथकाच्या पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण, ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे, समुपदेशक ऍड. प्रार्थना सदावर्ते आदी या वेळी उपस्थित होते.

- दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

या वेळी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या महिला पोलिसांनी कराटेचे तसेच छेडछाड, टिंगलटवाळीच्या परिस्थितीत गुंडांचा सामना कसा करायचा याचे प्रात्यक्षिक सादर केले. दामिनी पथकाने आत्तापर्यंत सुमारे साडेसात हजार शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. तसेच, 339 जणांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

- कॉंग्रेसमध्ये 'येथे' पुन्हा एकदा नियुक्ती वाद 

भरोसा सेलमधील वर्षभरातील स्थिती :

एकूण प्राप्त अर्ज- तीन हजार 99
अर्जांचा निपटारा- दोन हजार 248
प्रगतीपथावर - 851
ज्येष्ठ नागरिक कक्षात प्राप्त अर्ज - 617
अर्जांचा निपटारा- 562
वंचित, अल्पवयीन मुलांचे समुपदेशन- दोन हजार 693

भरोसा सेलमध्ये येणाऱ्या नागरिकांना आधार मिळतो. कल्पना करणे सोपे असते; पण प्रत्यक्षात काम करणे अवघड असते. मनामध्ये विश्‍वास ठेवून येणाऱ्या लोकांना न्याय मिळतो. त्यामुळे मी समाधानी आहे. पुणे पोलिसांकडून असेच सकारात्मक काम सुरू राहील.
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars expressed their views about Bharosa cell launched by Pune city police