लाट थोपविणे आपल्याच हाती 

Corona
Corona

एका बाजूला जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत आहे. व्यवसाय, उद्योगाची पुनर्बांधणी होऊ लागली आहे. बाजारात ‘नॉर्मल’ वातावरण जाणवू लागले आहे. अशावेळी कोरोनाला दूर ठेवण्यासाठीची संपूर्ण काळजी घेणे, लक्षणे आढळताच उपचार सुरू करणे, स्वतःहून क्वारंटाइन होणे ही पथ्ये प्रत्येकाने पाळली तर कोरोनाची दुसरी लाट रोखणे सहजशक्‍य आहे. अन्यथा, दुसरी लाट सर्वकाही वाहून नेईल, ज्यातून बाहेर पडणे कदाचित शक्‍यही होणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजधानी दिल्लीत मास्क न वापरणाऱ्यांकडून दोन हजारांचा दंड वसूल केला जातोय. अहमदाबादमध्ये सोमवारपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यात रुग्णवाढीचा दर दहा टक्‍क्‍यांवरून चौदा ते सोळा टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. एकूणच या बाबी नक्कीच चिंता वाढविणाऱ्या आहे. आनंदात कोणताही खंड पडू न देता सर्वांनी आपापल्या परीने दिवाळी साजरी केली. आठ महिन्यांच्या खंडानंतर रुग्णसंख्या बऱ्यापैकी कमी झाली आणि उद्योग-व्यवसायासह जनजीवन पूर्ववत झाल्याचा आनंद त्यात अधिक होता. एका बाजूला हे सकारात्मक वातावरण असताना कोरोनाचा विषाणू आपला पिच्छा सोडायला तयार नाही, हे जगभरातील वातावरणावरून दिसून येत आहे.

अमेरिका, इटलीसह युरोपीय देशांत पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ आली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. ही लाट आपल्या उंबऱ्याबाहेर उभी आहे. यात आपल्याला मिळालेली एक संधी म्हणजे हे संकट आपल्याला दूर लोटता येणार आहे. ज्या हिमतीने, ताकदीने आणि सार्वजनिक भान जपत आपण रूग्णसंख्या कमी केली. मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या अनेक रुग्णांना योग्य उपचार देऊन सुखरूप घरी आणले, तीच जिगर आता दुसरी लाट रोखण्यासाठी दाखवावी लागणार आहे. जे आपल्याच हातात आहे.

मार्च ते ऑगस्ट हा कालावधी सर्वांसाठी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी एकदम नवीन होता. शत्रूचा अंदाज नव्हता. लढण्यासाठी कोणती शस्त्र नव्हती. कोणती मात्रा कुठे चालेल याची जाणीव नव्हती. परंतु गेल्या नऊ महिन्यांत या सर्वांचा अंदाज आपल्याला आला आहे. उपचाराची पद्धती अनेकविध प्रयोगानंतर निश्‍चित झाली आहे. कोविड सेंटर, जम्बो रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन, विविध औषध, इंजेक्‍शन, डॉक्‍टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ ही फौज तयार आहे. थोडक्‍यात आपल्याकडे आता पायाभूत सुविधांची साखळी तयार आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट ही यंत्रणा सज्ज आहे. पण गरज आहे ती प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर काळजी घेण्याची. 

दिवाळीत खरोखरीच आपण कोरोना आपल्या गावी नाहीच अशाच थाटात वागलो आहोत. आरोग्य विभागाने घालून दिलेले नियम सर्रास पायदळी तुडवले. त्यामुळे खरोखरच धोका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या वाढली. सध्या शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे सक्तीचे केले आहे, त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढलेली दिसते. पण एक हजार चाचण्यांमागे असणारे रूग्णसंख्येचे प्रमाण चौदा टक्‍क्‍यांच्या पुढे गेले आहे, हे धोक्‍याचे आहे. काही लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यायला हवेत. कोरोनाला हद्दपार करण्याची संधी चालून आली आहे, त्याचा फायदा उठवायचा की, पुन्हा लॉकडाउन स्वीकारायचे हे पूर्णपणे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. 

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी

  • ज्येष्ठ, मुलांना सार्वजनिक ठिकाणी जाणे सक्तीने टाळावे.
  • मास्क नाका-तोंडाच्या खाली नकोच.
  • लक्षणे आढळताच उपचार, चाचणी करा.
  • कोणतीही माहिती लपवू नका. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com