का होताय जिवावर उदार!

Hand-Wash
Hand-Wash

जर 'कोरोना' या एकाच निकषावर लॉकडाऊन खुले करण्याची वेळ आली असती, तर सहाजिकच पुण्यात लॉकडाऊन उठविण्यास सध्याच्या परिस्थितीत परवानगी मिळालीच नसती. कारण गेल्या दोन महिन्यांच्या काळात ना रूग्णसंख्या कमी झाली ना मृतांचा आकडा. फक्त लॉकडाऊनमध्ये राहणे हे आपल्या कोणालाच परवडणारे नाही, या एका कारणासाठी आपणाला बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे. जर असे असेल तर मग किमान स्वतःची आपण किती काळजी घ्यायला हवी. दुर्दैवाने हे होत नाही. आजही आपण बिनधास्त आहोत. अगदी जीवावर उदार झालो आहोत.

ऑफीसला येताना कात्रजच्या लेकडाऊन सोसायटी समोरच्या रस्त्यावर एक आजोबा आपल्या तीन नातवंडांना घेऊन एका मोटारसायकलवरून निघाले होते. आजोबांसह त्या छोट्या-छोट्या मुलांनाही साधा मास्कही लावलेला नव्हता. बरं आजोबा अगदी सुखवस्तू कुटुंबातील "सुशिक्षित' वगैरे असावेत असे वाटत होते. हा एवढा आत्मविश्‍वास येतो कुठून? बरं तिथून पुढे बिबवेवाडी रस्त्यावर एका वाइन शॉपसमोर लागलेल्या रांगेत कोणतेही अंतर न पाळता ग्राहक एकमेकांना खेटून उभे होते. चौकात भाजी विकणाऱ्या मावशींनी स्वतः तोंडाला काहीच बांधले नव्हते, पण त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेल्यांना कोथिंबिरीची गड्डी एवढी महाग का? हे विचारण्याच्या नादात शारीरिक अंतराचे भानही नव्हते. लॉकडाऊन नंतरच्या अडीच महिन्यानंतर कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट असणाऱ्या पुण्यातील ही ताजी वस्तुस्थिती.
कोरोना किती भयानक विषाणू आजार आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, तो कसा होतो, त्याला रोखण्यासाठी काय करायला हवे, हे सारे लहानथोरांसह सर्वांना तोंडपाठ झाले आहे. पण प्रश्‍न असा आहे की, नियम पाळायचे कोणी?

आपण एकाने नाही मास्क लावला, नाही हात धुतले, नेहमीप्रमाणे रस्त्यावर पचकन थुंकलो, तर काय फरक पडणार याच मानसिकतेत कोरोनाच्या अडीच महिन्यानंतरही आपण आहोत. याचाच अर्थ असा की, आम्ही आजही बेफिकीर आहोत. जे 90 टक्के लोक नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत, त्यांच्या जिवाची आम्हाला अजिबात पर्वा नाही.

पुण्यातील कोरोना चाचणीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढविण्यात आले त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढलेला दिसतो असा दावा केला जात आहे. या दाव्यात काही अंशी तथ्य असले तरी मागील तीन लॉकडाऊनच्या काळात आम्ही काळजी घेण्यास कमी पडलो, असाही याचा अर्थ होतो.

प्रशासनाचा सध्याचा फोकस तरी रूग्णसंख्या वाढल्यानंतर त्यांच्यासाठी आवश्‍यक असणारे बेड उपलब्ध होतील का? व्हेंटिलेटर कमी पडणार नाहीत ना? औषधे कमी पडणार नाहीत ना यावर आहे. तो असायलाही हवा. पण कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर अजून जास्ती भर देण्याची गरज आहे. झोपडपट्टी आणि दाटवस्तीमधील रूग्णसंख्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे कळत नाही. पत्रे ठोकून रस्ते अडवले म्हणजे पेठांमधील कोरोना रोखला हे होऊ शकत नाही. त्यासाठी शास्त्रीय उपाययोजनाच कराव्या लागतील. आपल्याला अजून सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ आणि सॅनिटाईज करता आलेली नाहीत. त्यामुळेच रूग्णसंख्या दररोज अडीचशे ते तीनशेने वाढत आहे. ही संख्या आणखी काही दिवस वाढतच राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

लॉकडाऊन उठविल्यानंतर पुढच्या आठवड्यात रूग्णसंख्या कशी वाढते हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत प्रशासनाने रुग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे. प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे, दाट लोकवस्तीत रूग्णसंख्या रोखण्यासाठी तातडीने पावले टाकणे आवश्‍यक आहे. तर नागरिकांनी घरातून बाहेर पडल्यापासून पुन्हा घरी येईपर्यंत मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर, हात धुणे, योग्य आहार, नियमित व्यायाम, प्रतिकारशक्ती आणि मनाची शक्ती टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न करावेच लागतील. अन्यथा कोरोना आणि बेकारी-उपासमार या दोन्ही संकटापासून कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही, हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com