कोरोनाच्या सावटात पुणे विद्यापीठाचा तब्बल 'इतक्या' कोटींचा अर्थसंकल्प झाला मंजूर!

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 25 June 2020

पुणे विद्यापीठाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने अंदाजपत्रक ६१ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे.

पुणे : 'कोरोना'च्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उत्पन्न व खर्चाचे गणित बिघडणार आहे. याच सावटाखाली ऑनलाईन अधिसभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ६१ कोटी रुपयांची तूट असलेला ६५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोरोनाच्या दृष्टीने तरतूद नसल्याने पुरवणी अर्थसंकल्पात याची तरतूद केली जाणार आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली
गुरुवारी (ता.२५) सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या अधिसभेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर अधिसभा सदस्यांनी चर्चा करून त्यास मान्यता दिली. या संकल्पात विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती योजनेचा समावेश केला असून यासह काही विशेष उपक्रम हाती घेण्यात आली आहे. यात पदव्युत्तर विद्यार्थी आदान-प्रदान करण्यासाठी सेतू कार्यक्रमासाठी २५ लाख, ऐतिहासिक स्थळ दत्तक योजनेसाठी १० लाख, युवक-युवती उन्नयनीकरण तारुण्यभान उपक्रमासाठी ५० लाख रुपये, काश्‍मिर लेह-लडाख शैक्षणिक प्रकल्पासाठी १० लाख रुपये विशेष तरतूद करण्यात आली आहे.

- बारामतीनंतर आता पुण्यात गोपीचंद पडळकरांविरुद्ध तक्रार दाखल

शिष्यवृत्ती योजनेसाठी ९ कोटी रुपये
पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी पाच नव्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. त्यातून १५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी १ कोटी तरतूद असून, १ हजार ९५५ विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १ लाखाची तरतूद असून, २ हजार ८२२ जणांना लाभ मिळेल. तर राजर्षी शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले योजनेसाठी प्रत्येकी २ कोटीची तरतूद असून, यात प्रत्येकी  दोन हजार लाभार्थी विद्यार्थी असणार आहेत. या ८ हजार ७७७ विद्यार्थ्यांपैकी पदवीचे ५ हजार ७३९ तर पदव्युत्तर पदवीचे ३ हजार ३८ विद्यार्थी लाभ घेतील. तसेच स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजनेसाठी ३ कोटी १५ लाखाची तरतूद केली आहे. यात सुमारे सात हजार जनांना लाभ मिळणार आहे.

- पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; काय झालं सभेत?

६१ कोटीची तूट
पुणे विद्यापीठाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने अंदाजपत्रक ६१ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. २०२०-२१ मध्ये विद्यापीठाचा खर्च ६५६ कोटी आहे. तर उत्त्पन्न ५९५ कोटी इतके असणार आहे. 

विद्यापीठ अर्थसंकल्प जमा होणारा निधी (टक्केवारी) :
वेतन राज्य सरकार अनुदानित - २० 
प्रशासकीय सर्वसाधारण विकास -१६ 
परीक्षा विभाग - २७
विद्यापीठ शैक्षणिक पदव्युत्तर विभाग ६ 
विद्यापीठ प्रकाशने - ०
विद्यार्थ्यांसाठी सेवा विभाग - २ 
पायाभूत सेवा विभाग - २ 
स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम व योजना - ४ 
स्वतंत्र प्रकल्प व योजना (अनुदान) -१३
तूट -    ९ 

- 'या'मुळे पुण्यात वाढली कोरोनाची रुग्णसंख्या; आरोग्य अधिकाऱ्यांनीही केलं मान्य!

विद्यापीठ अर्थसंकल्प खर्च होणारा निधी (टक्केवारी) :

वेतन राज्य सरकार अनुदानित - २० 
वेतन विनाअनुदानित - १० 
प्रशासकीय विभाग - ३ 
विद्यार्थी विषयक सेवा सुविधा - ३६ 
पायाभूत सेवा विभाग - ७
शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम - २ 
इमारत बांधकाम, सुविधा, सुधारणा - ९ 
स्वतंत्र प्रकल्प व  योजना (अनुदान) १३ 

यासाठी खर्च केला जाणार निधी
अर्थसंकल्पातल खर्चविषयक तरतुदी
इमारती बांधकामासाठी २६ कोटी ३६ लाख
 विद्यापीठ सुविधा-सुधारणांसाठी ४ कोटी १६ लाख
 विद्यार्थ्यांच्या उपक्रमांसाठी : २१ कोटी ८७ लाख
 गुणवत्ता सुधार कार्यक्रम : १३  कोटी २० लाख
 समर्थ भारत अभियान : १ कोटी ५० लाख
आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण : २ कोटी  

- #BoycottChina : अख्ख्या गावानेच केलाय चिनी उत्पादनांचा बहिष्कार; कोणतं आहे हे गाव?

"विद्यापीठाच्या या अर्थसंकल्पातून विद्यार्थ्यांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांना निधी देण्याचा प्रयत्न आहे. करोनाच्या काळात आपल्याला काटकसर आणि खर्च कमी करावा लागणार असून, इमारत बांधकाम, स्टेशनरी, कार्यालयीन उपकरणे, हंगामी सेवक, सुरक्षा, स्वच्छता, मोठे समारंभ यावरील खर्च कमी केला जाणार आहे."
- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

"हा अर्थसंकल्प कोरोनाच्या पूर्वी तयार केला आहे, त्यात अनेक सुधारणा कराव्या लागणार आहेत. कोरोना मुळे ऑनलाईन शिक्षण द्यावे लागणार असल्याने पुरवणी अंदाजपत्रकात त्यादृष्टीने तरतूद केल्या जातील. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे."
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune Universitys budget of Rs 656 crore was approved in Corona crisis