Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी

Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी

पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली.

केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला.

‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला...

पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली.

‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या.

नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’

संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’

‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’
इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले. 

अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आज सवाईमध्ये
अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com