कोरोना योद्धा : तब्बल महिनाभरानं झाली माय-लेकरांची भेट!

Dr.Minal_Pachunde
Dr.Minal_Pachunde

बालेवाडी (पुणे) : पोटच्या गोळ्याची नजर चुकवून, त्याला डोळ्याआड ठेवून ती माऊली महिनाभर रोज क्वॉरंटाईन सेंटर गाठायची. तिथे 10 ते 12 तास घालवल्यानंतर पुन्हा धावतच घर गाठायची, पण तोवर तिचा नवरा ती घरी येईल आणि मूल आईला बिलगेल, या भीतीने बाळाला अंगाई ऐकवून, गोष्टी सांगून झोपी घालायचा. त्यामुळे बाळ आणि आई एकमेकांसमोर गेले महिनाभर आलेच नाहीत, एकमेकांना भेटले नाहीत.

अखेर महिनाभरानंतर आई रोजच्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून घराबाहेर पडत असतानाच, घरातून मुलाने आईला हाक मारली आणि आई मला न भेटताच जात होतीस काय? आज तू कशी सापडलीस? असं म्हणत त्याने तिला मिठी मारली. तिने ही आपल्या बाळाला कडकडून मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बघाना या कोरोनाने काय काय वाढून ठेवलंय आपल्यापुढे. लाडक्या पोटच्या गोळ्यात आणि आईमध्ये त्यानं हे केवढं अंतर निर्माण केलंय.

मुलाला भेटायला व्याकुळ झालेली ही आई म्हणजे डॉक्टर मीनल पाचुंदे (वय 42). या गेल्या दीड वर्षापासून बाणेर येथील स्मार्ट सिटी क्लिनिकमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत, पण सध्या बालेवाडी येथील निकमार कोविड केअर सेंटरमध्ये 'कोरोना योद्धा' म्हणून त्या काम करत आहेत. 22 एप्रिलपासून या डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत आहेत. घरात दोन मुले अथर्व (वय 15) आणि अर्णव (वय 6), 70 पेक्षा जास्त वय असलेले आई-बाबा तसेच इंजिनिअर असलेले पती सुनील. शासनाकडून

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्या असे सांगितले जात असताना, डॉ. मीनल या सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेत आपल्या कर्तव्यासाठी घराबाहेर पडत आहेत. घरातील मंडळींना आपल्यामुळे त्रास होऊ शकतो, हा विचार मनात येऊन त्या बेचैन होत होत्या. त्यातच मुलांना भेटता येत नाही ही व्याकुळता. पण मनाच्या बेड्या पायात बांधत जड पावलांनी त्या कोरोना केअर सेंटर गाठत होत्या.

लहान मुलगा आईला भेटण्याचा हट्ट करत होता, मग आई फक्त फोनवरून बोलून त्याची समजूत काढत होती. रात्री झोपताना हा छोटुकला आपल्या बापाच्या कुशीत कसाबसा झोपत होता. असे करत करत महिना सरला आणि एक दिवस सकाळी डॉ. मीनल घराबाहेर पडत असताना, आतून आवाज आला, "आई मला न भेटताच जात होतीस काय? आज कशी सापडली!" असे म्हणत अर्णव आईला येऊन बिलगला. मुलाला भेटायला आतुर  झालेल्या आईनेही त्याला घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली, पण सेंटरवर जायची वेळ झाली होती, त्यामुळे अश्रू आवरत मनाला सावरत त्यांनी कसेबसे मुलांना समजावले आणि त्या सेंटरवर पोहोचल्या.

दिवसाचे दहा ते बारा तास त्या डॉक्टर काम करत असून या महिन्यामध्ये त्यांनी केवळ एकच सुट्टी घेतली आहे. अशा पद्धतीने स्वतःच्या कुटुंबाचा, मुलांचा विचार करत पण स्वतःचे मनोधैर्य न डगमगता ही माऊली इतरांचे मनोधैर्य वाढवत आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पेलत आहे. 'कोरोना योद्धा' म्हणून आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या डॉ. मीनल यांना 'सकाळ'चा सलाम!

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com