Video:संजय राऊत म्हणतात, 'राज यांनी का पलटी मारली माहिती नाही'

टीम ई-सकाळ
Saturday, 21 December 2019

राज्यात बिनपैशांचा तमाशा सुरू असल्याची टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला.

पुणे : 'नव्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांकडे सत्तेचा "रिमोट' आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही आणि ते कोणी पाडणारही नाही. हे सरकार पाच वर्षे सत्तेत राहील,' असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे शिवसेनेची साथ कधीच सोडणार नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज ठाकरे यांना टोला!
राज्यात बिनपैशांचा तमाशा सुरू असल्याची टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही राऊत यांनी समाचार घेतला. 'राज्यात भाजपने पैशांचा तमाशा केला होता. तो आम्ही रोखला. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत पलटी का मारली? हे मला कळले नाही,' असे राऊत यांनी सांगितले. विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी राऊत पुण्यात आले असता, त्यांनी "सकाळ'च्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. नव्या सरकारमधील घटकपक्षांची भूमिका, या पक्षांचा अजेंडा, सत्तेसाठीच्या तडजोडी, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महाविकास आघाडीचे भवितव्य, यासह सरकारस्थापनेच्या नेमक्‍या घडामोडींबाबत राऊत यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. "सरकार फार काळ टिकणार नाही,' या चर्चेचा संदर्भ देऊन हे सरकार स्थिर असल्याचे त्यांनी सूचित केले. 

संजय राऊत बोलले तरी, मीच पक्षाचा अध्यक्ष : शरद पवार 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे. पवार हे थेट राजकारण करणारे आहेत. पडद्यामागून ते काहीच करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे सत्तेचा "रिमोट' आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. 
-संजय राऊत, खासदार, राज्यसभा 

प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वाची 
राज्यातील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याच्या मोहिमेत कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून नव्या सरकारचे गणित मांडताना प्रियांका यांनी बरीच जुळवाजुळव केल्याचे सांगून संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा प्रवास उलगडला. ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोनिया यांच्या संपर्कात होते,'' असेही संजय राऊत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader sanjay raut special interview sakal statement on raj thackeray