'राष्ट्रीय इंडियन मिलिटरी'च्या परीक्षेत पुण्याचा शुभम महांगरे चमकला!

Shubham_Mahangare
Shubham_Mahangare

धनकवडी (पुणे) : 'यूपीएससी'द्वारे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजतर्फे (Rashtriya Indian Military College) घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत शुभम गणेश महांगरे यांची निवड झाली आहे. शुभमने डिसेंबर २०१९ मध्ये परीक्षा दिली आणि त्याचा निकाल गुरुवारी (६ ऑगस्ट) जाहीर झाला. या परीक्षेत शुभमने ४५० पैकी ३४१.३ गुण मिळवून महाराष्ट्र्रात प्रथम तसेच देशात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (Rashtriya Indian Military College) ही केंद्र सरकारच्या अधीन काम करते. या संस्थेत भारतीय मुलांना आठवी ते बारावी शिक्षण सीबीएसई पॅटर्ननुसार (CBSE) आणि त्याबरोबर एनडीएसाठी (NDA) प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत प्रवेशासाठी दर वर्षी जून आणि डिसेंबर या महिन्यात यूपीएससीद्वारे भारतातून २५ मुलांची निवड केली जाते. या परीक्षेत गणित २०० गुण, इंग्रजी १२५ गुण, सामान्य ज्ञान ७५ गुण आणि ५० गुणांची मुलाखत असते. परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ५०% गुण मिळवावे लागतात.

महाराष्ट्रातून दर सहा महिन्याला या संस्थेत दोन मुलांची निवड केली जाते. या संस्थेचे ९५% विद्यार्थी एनडीएमध्ये निवडले जाऊन ते पुढे भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम करतात. शुभम हा पुण्यातील कात्रज येथील रहिवासी असून त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील गुठाळे हे आहे. तो महाराष्ट्रीय मंडळ इंग्लिश माध्यम शाळा टिळक रस्ता येथे सध्या सातवीमध्ये शिकत आहे. त्याला त्याच्या लहानपणापासून भारतीय वायुदलाचे आकर्षण आहे. शुभमच्या पालकांनी या विषयी माहिती मिळवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कोथरूड येथील विवेक बल फाऊंडेशनच्या डॉ. रश्मी कुलकर्णी आणि राजेंद्र कुलकर्णी यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुभमचा अभ्यास सुरू झाला.

शुभमच्या यशाचे पूर्ण श्रेय डॉ. रश्मी कुलकर्णी आणि राजेंद्र कुलकर्णी यांना जाते असे शुभमच्या वडिलांनी सांगितले. शुभमच्या यशाबद्दल त्याची आजी द्रौपदा, वडील गणेश आणि आई नीलिमा महांगरे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच त्याच्या शाळेलाही त्याच्या यशाचा अभिमान आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com