मुळशी तालुक्याला मिळणार तिसरे पोलिस ठाणे

मुळशी तालुक्याला मिळणार तिसरे पोलिस ठाणे

पौड - बावधन (ता. मुळशी) येथील चौकीचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याचा प्रस्ताव पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे. या ठाण्यात तालुक्यातील भूगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे, नांदे, चांदे या सहा गावांचा समावेश प्रस्तावित आहे. त्यामुळे तालुक्यात आता पौड, हिंजवडीबरोबरच बावधन हे तिसरे पोलिस ठाणेही उभे राहण्याची शक्यता आहे. तथापि बावधन पोलिस ठाण्यात समाविष्ट होण्यास गावांनी मात्र विरोध दर्शविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

96 गावे असलेल्या मुळशी तालुक्यात यापूर्वी कायदा सुव्यवस्थेचा सर्व कारभार पौ़डमधून चालायचा. त्यामुळे चांदणी चौक, म्हाळुंगे, हिंजवडीपासून पश्चिमेकडील सर्व गावे पौड पोलिस ठाण्यालाच जोडली गेलेली होती. हा भाग भौगोलिकदृष्ट्या मोठा होता. कालांतराने औद्योगिकरणामुळे जागतिक आयटीनगरी झालेल्या हिंजवडीला स्वतंत्र पोलिस ठाणे मिळाले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली या ठाण्याची निर्मीती झाली. माण, मारूंजी खोऱ्यातील सर्व गावे, तसेच बावधन, सूस, म्हाळुंगे ही गावेही या ठाण्याला जोडली गेली. कारभाराच्या सुविधेसाठी या पोलिस ठाण्याच्या अंकित बावधनला पोलिस चौकी सुरू झाली.

तालुक्याच्या पूर्व भागात शहरीकरण वाढले. आलीशान इमारती, आयटी कंपन्या, व्यवसायांमुळे परजिल्ह्यातील परप्रांतातील नागरिकही नोकरी, धंद्यामुळे या परिसरात राहत आहेत. तथापि या भागातील गुन्हेगारीवर वचक रहावा, यासाठी पिरंगुट येथे पोलिस चौकी सुरू झाली. याठिकाणी चौकीची इमारतही बांधली आहे. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कमी मनुष्यबळातही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्व पट्ट्यातील गावांत कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवली आहे. तालुक्याची पंचायत समिती, तहसिल कचेरी, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, अशी महत्वाची प्रशासकीय कार्यालये पौडमध्येच आहे. त्यामुळे पूर्वभागातील नागरिकांची सर्व शासकीय कामे एकमार्गी होत असतात.

तथापि वाढत्या नागरिकरणामुळे बावधन चौकीचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्यात यावे असा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी शासनाकडे पाठविला. त्यात तालुक्यातील भूगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे, नांदे, चांदे या पाच गावांचा समावेश करण्यात येणार आहे. तथापि नवीन पोलिस ठाण्याची हद्द निश्चित करताना शासनाच्या 2005 च्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी आणि समावेश करणाऱ्या गावातील ग्रामस्थ लोकप्रतिनिधींची सहमती घेतली जाते. त्यामुळे याबाबत ग्रामस्थांची बैठक घेवून त्यांच्या मताचा अहवाल आयुक्तांनी मागवला आहे. परंतू नव्या पोलिस ठाण्यात समाविष्ट होण्यास सहाही गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.

प्रतिक्रिया -
निकीता सणस (सरपंच, भूगाव ) -
आम्हाला सर्व प्रशासकीय कामांसाठी पौडला जावे लागते. भूगावहून पौडला जाण्यासाठी एकमार्गी रस्ता आहे. त्यामुळे आमचा समावेश पौड पोलिस ठाण्यातच असावा. नव्याने होणाऱ्या बावधन पोलिस ठाण्यात समाविष्ट होण्यास आमच्या गावचा विरोध आहे.

प्रशांत रानवडे (माजी सरपंच, नांदे) - पौडला सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या कामासाठी पौड पोलिस ठाणे आणि पाषाणचे पोलिस अधिक्षक कार्यालयही आम्हाला जवळच आहे. त्यामुळे पौड पोलिस चौकी आमच्यासाठी सोयिस्कर आहे. एका कामासाठी बावधनला आणि दुसऱ्या कामासाठी पौडला अशी ससेहोलपट करू नये. पिंपरी चिंचवड भागात आमचा समावेश करू नये.

सुखदेव मांडेकर (माजी सरपंच, चांदे) - आम्हाला पौडपेक्षा बावधन खूप लांब आहे. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास पौडला तातडीने संपर्क होवू शकतो. त्यामुळे आमचे गाव पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच रहावे, अशी आम्हा ग्रामस्थांची विनंती आहे.

चांगदेव पवळे (सरपंच, पिरंगुट) - पौड पोलिस ठाण्याअंतर्गत असलेली पोलिस चौकीच आमच्या गावात आहे. त्यामुळे आमच्या गावाबरोबरच येथे वसलेल्या औद्योगिक वसाहतीमध्येही सर्व कामकाज सुरळीत व शांतपणे चालू आहे. बावधन आणि पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालय ही दोन्ही ठिकाणे आमच्यापासून लांब असल्याने आमचे गाव पौडला समाविष्ट असावे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com