तलावांना 'रोहयो'चा 'आधार'; बेरोजगारांना रोजगार आणि शेतीला पुरेसे पाणी होणार उपलब्ध!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

गेल्या वर्षीपर्यंत राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ही कामे केली जात असत. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. पर्यायाने मागील वर्षीपासून ही योजना बंद पडली आहे. 

पुणे : जिल्ह्यातील पाझर आणि गाव तलावांना यंदा रोजगार हमी योजनेचा भक्कम आधार मिळाला आहे. या तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या तलावांमधील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगार आणि शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. 

- 'विद्यार्थ्यांसाठी कायपण'; राज्य सरकारचा 'हा' आहे नवा फंडा!

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचा आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिला आहे. यानुसार जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींनी ही कामे सुरू केली असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

गेल्या वर्षीपर्यंत राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ही कामे केली जात असत. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. पर्यायाने मागील वर्षीपासून ही योजना बंद पडली आहे. 

- Big Breaking : यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द

या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच रोजगार हमी योजनेतून या तलावांमधील गाळ काढण्यात येऊ लागला आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगार आणि शेतीसाठी पुरेसे पाणी असा दुहेरी हेतू साध्य होणार आहे. दरम्यान, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार मिळेना झाला आहे. यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे. 

जिल्ह्यात एकूण ६२० पाझर तलाव आणि १०५ गाव तलाव आहेत. यापैकी पाझर तलावांमधील गाळ काढण्यासाठी रोजगार हमीतून २८ कोटी १४ लाख ४३ हजार रुपये तर, गाव तलावांमधील गाळ काढण्यासाठी ३ कोटी ३२ लाख २७ हजार असा एकूण ३१ कोटी ४६ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- पुणे : बदलीची चर्चा आणि रूबल अग्रवाल भल्या पहाटेच उतरल्या रस्त्यावर

अडीच टीएमसी पाणीसाठा 

जिल्ह्यातील सर्व पाझर व गाव तलावांची मिळून एकूण अडीच टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. परंतु गेल्या वर्षी झालेल्या तुफान पावसामुळे अनेक तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे पाणी साठवण क्षमतेतही मोठी घट झाली आहे. गाळ काढल्यानंतर पूर्ववत अडीच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे. 

- जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री; जाणून घ्या अजित जोगी यांचा रंजक प्रवास!

सिंचनाला हातभार लागणार

या सर्व तलावांमधील पाण्यामुळे पुणे जिल्ह्यातील १७ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते आहे. यापैकी पाझर तलावांमधील पाण्यामुळे १६ हजार ८५१ हेक्टर तर, गाव तलावांमधील पाण्यामुळे ८४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Through Rojgar Hami Yojana sludge removal has been started from the ponds and village lakes in the district