लाईव्ह न्यूज

अमृता, अनिताने उलगडला ‘जारण’

अमृता, अनिताने उलगडला ‘जारण’
Published on: 

प्रेक्षकांच्या भेटीला नुकताच आलेला ‘जारण’ चित्रपटाचा प्रवास उलगडत त्यातील भूमिकेबद्दलचे अनुभव अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते-केळकर यांनी मांडले. चित्रपटाच्या निर्मितीपासून त्यांच्या यशापर्यंत घडलेले अनेक किस्से त्यांनी सांगितले. ‘साम’च्या प्रेरणा जंगम यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
‘‘विषयाचे वेगळेपण. उत्तम दिग्दर्शन आणि संगीत अशा अनेक चांगल्या बाबी ‘जारण’मध्ये आहेत. हा चित्रपट अनेकांना भावला आहे. त्यामुळे त्याला मोठे यश मिळाले. खरेपणाला भाषा नसते. त्यामुळे लोकांना भाषा आवडते. त्यात हिंदी किंवा मराठी असे काही नसते,’’ असे अमृता म्हणाल्या.  
अनिता म्हणाल्या, ‘‘वेळ आणि शिस्त जपत मागणीप्रमाणे काम केले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात ते महत्त्वाचे असते. चित्रपट क्षेत्रात हिंदी आणि मराठी असे भाषानिहाय वेगळे काही नसते. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक चांगल्या बाबी शिकता आल्या. अमृता ही सच्ची अभिनेत्री आहे. ‘जारण’मुळे आमची चांगली मैत्री झाली. याचा मला आनंद आहे. घरातील प्रमुख व्यक्तीने कसे असावे, याचे ती एक चांगले उदाहरण आहे. चित्रपटाच्या यशात तिच्या चांगुलपणाचाही एक वाटा आहे.’’ 

पोस्टरवर दोनच अभिनेत्री असतानाही प्रतिसाद :
चित्रपट आणि हीरो हे एक समीकरण आहे. त्यामुळे आम्हाला देखील विचारणा होत होती की, चित्रपटात हीरो कोण आहे किंवा प्रेक्षकांना देखील त्याबाबत उत्सुकता असते. मात्र या चित्रपटाचा पोस्टरवर केवळ दोन अभिनेत्री आहेत, असे असतानाही ‘जारण’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महिला कलाकारांसाठी ही महत्त्वाची बाब आहे, असे अमृता आणि अनिता यांनी सांगितले. 

२० दिवसांत ६ कोटींची कमाई :
हिंदी चित्रपटांच्या गर्दीत मराठी चित्रपट ‘जारण’ने दर्जेदार कथानक आणि जबरदस्त अभिनयामुळे आपले स्थान निर्माण केले आहे. ‘जारण’ या चित्रपटाने अवघ्या २० दिवसांत तब्बल ६ कोटी रुपयांची घवघवीत कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर आपली ठसठशीत छाप सोडली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शोजही प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे वाढविण्यात येत आहेत.
समीक्षक, चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून, माऊथ पब्लिसिटीमुळेही ‘जारण’ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. कथा, अभिनय, सादरीकरण आणि दिग्दर्शन या सर्व बाबतींत ‘जारण’ने उच्च दर्जा कायम ठेवला आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून, चित्रपटाची कथा ही आजच्या सामाजिक वास्तवाशी नातं सांगणारी आहे. 
चित्रपटाची निर्मिती बाझमी प्रॉडक्शन्स, ‘ए अँड एन सिनेमाज एलएलपी’ यांच्या सहकार्याने आणि ‘ए ३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिस’ यांच्यामार्फत करण्यात आली आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली असून, मनन दानिया सहनिर्माते आहेत. यात अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या अभिनयाने कथेला सशक्त बळ मिळाले आहे. त्यांच्यासोबत किशोर कदम, ज्योती मालशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी आणि सीमा देशमुख यांचा अभिनयही विशेष लक्षवेधी ठरतो.
आजच्या काळात समाजमनावर भाष्य करणारा आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे ‘जारण’च्या यशावरून स्पष्ट होते. या चित्रपटाने मिळवलेली भरघोस यशाची घोडदौड पाहता, ‘जारण’ लवकरच आणखी मोठा टप्पा पार करेल, यात शंका नाही. 
 
कॉफी टेबल बुक एक दृष्टिकोन...
‘‘व्यवसाय करताना आपण छान केले आहे हे स्वतःला आणि इतरांना सांगणे गरजेचे आहे. व्यावसायिकांचा प्रवास असलेले ‘कॉफी टेबल बुक’ एक दृष्टिकोन आहे. यशस्वी उद्योजकांनी केलेल्या कामाला ही एक थाप आहे,’’ असे अमृता म्हणाल्या. तर अनिता म्हणाल्या, ‘‘मला व्यावसायात रस असून मी अजूनही व्यवसाय करते. व्यवसाय करणे ही एक गंमत असते. यात यश-अपयश, नफा-तोटा असतो. ‘सकाळ’ने हा कार्यक्रम आयोजित करून अनेक उद्योजकांच्या कामाचा गौरव केला आहे.’’

कोरेगाव पार्क, पुणे : ‘जारण’ चित्रपटाबाबत प्रेरणा जंगम यांनी अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते-केळकर यांची मुलाखत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com