लाईव्ह न्यूज

दीडशे बालकांच्या शस्त्रक्रिया रखडल्या

दीडशे बालकांच्या शस्त्रक्रिया रखडल्या
Published on: 

ज्ञानेश्‍वर भोंडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ : ससून रुग्‍णालयातील दुसऱ्या मजल्‍यावर बाल शस्त्रक्रियागृहासह मोठ्यांच्या शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी सात शस्‍त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर-ओटी) आहेत. सहा महिन्‍यांपूर्वी नूतनीकरणासाठी हे शस्त्रक्रियागृह बंद होते. आता त्‍याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्‍या सर्व सातही शस्त्रक्रियागृहांवर सामान्‍य शस्‍त्रक्रिया विभागाकडून (जनरल सर्जरी) दावा केला जात आहे. त्यामुळे सामान्‍य शस्‍त्रक्रिया व बालरोग शस्‍त्रक्रिया या दोन विभागात ‘ओटीवॉर’ सुरू आहे. त्‍यामुळे १५० बालकांच्या गुंतागुंतीच्‍या शस्त्रक्रिया रखडल्‍या आहेत.
बालरोग शस्त्रक्रिया (पेडियाट्रीक सर्जरी) या सुपरस्पेशालिटी (अतिविशेषोपचार) विभागामार्फत विविध जन्मजात दोष व व्‍यंग (बर्थ डिफेक्‍ट, कंजेनायटल डिफॉर्मिटी) असलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्‍ये एक दिवसाच्या नवजात शिशुपासून ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होतो. यशस्वी शस्त्रक्रिया झालेली बरीच मुले पुढे सामान्य आयुष्य जगतात. त्‍याबरोबरच कर्करोगासाठीच्या (यकृत, मूत्रपिंड, आतडे, वृषण आणि अंडाशय) गुंतागुंतीच्‍या व जोखमीच्‍या शस्त्रक्रिया केल्‍या जातात. या जन्मजात दोषांचे वेळेत निदान होण्यासाठी व्यापक तपासण्या आवश्यक असतात.

इतर जिल्ह्यांतूनही येतात रुग्‍ण
अपघातात जखमी झालेल्या मुलांवरील शस्त्रक्रिया, बाललैंगिक शोषणामुळे झालेल्या जखमांवर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून त्‍या दुरुस्त करण्याचे जिकिरीचे उपचारही ससूनमध्ये केले जातात. या मुलांची २४ तास विशेष देखभाल करण्यासाठी निवासी डॉक्टर तत्पर असतात. याचा लाभ केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर सातारा, सांगली, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर जिल्ह्यांमधून येणाऱ्या ६०० ते ६५० बालकांना दरवर्षी होतो. शिवाय नवजात मृत्यूदर कमी करण्यातही विभागाचे मोठे योगदान आहे.

पर्यायी व्‍यवस्‍था खराब..
सध्‍या ट्रामा विभागाच्‍या उपलब्ध पर्यायी जागेत लहान मुलांच्या व नवजात बालकांच्‍या तात्‍पुरत्‍या शस्त्रक्रियागृहात तातडीच्‍या शस्त्रक्रिया केल्‍या जातात. परंतु, त्‍यासाठी लागू असलेल्या ‘इन्फेक्शन कंट्रोल’च्या निकषांचे पालन होत नसल्याने, शस्त्रक्रियापश्चात या मुलांमधील जखमांचा जंतूसंसर्ग होत असल्‍याने मृत्यूदरही वाढला आहे. शिवाय विभागातील दुर्बीण शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपिक) पूर्णपणे बंद असल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच विभागात रुजू झालेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही दूरगामी परिणाम होत आहे.

लहान मुलांची हेळसांड थांबवा
नूतनीकरण झाल्यावर देखील यापूर्वी बालरोग शस्त्रक्रिया विभागाच्या ताब्यात असलेले शस्त्रक्रियागृह या विभागाला डावलून प्रशासनाने ते इतर विभागांना वापरण्यास दिले आहे. हे तत्काळ रोखून विभागाच्या ताब्यात व वापरात असलेले नूतनीकरण झालेले शस्त्रक्रियागृह पुनःश्च विभागाला परत मिळवून द्यावे व शस्त्रक्रिया करावी लागणाऱ्या लहान मुलांची व कुटुंबीयांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी बालरोग शस्त्रक्रिया विभागातील डॉक्‍टरांनी अधिष्‍ठातां‍कडे केली आहे.

सामान्‍य शस्त्रक्रिया विभागाला शस्त्रक्रिया करणे सोयीचे होण्यासाठी त्‍यांनी सातही शस्त्रक्रियागृह हवे असल्‍याचे सांगितले आहे. बालशस्त्रक्रिया विभागालाही यातील एक शस्त्रक्रियागृह हवे आहे. याबाबत दोन्‍ही विभागांसोबत संवाद साधून लवकरच तोडगा काढण्‍यात येईल.
-डॉ. एकनाथ पवार,
अधिष्‍ठाता, ससून रुग्‍णालय

‘ससून’मध्ये दरवर्षी होणारे उपचार
३६ हजार बालके

- बाह्यरुग्ण विभाग

१२ हजार
- भरती करून उपचार व शस्‍त्रक्रिया

१५०० ते १८००
- जन्मजात दोष असलेले बालरुग्‍ण

तुमचे मत मांडा....
ससून रुग्‍णालयातील दोन विभागांमधील वादाचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे १५० बालकांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. याबाबत तुमचे मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com