पुण्यात फिरा आता दिवसभरात फक्त ४० रुपयात

पुण्यात फिरा आता दिवसभरात फक्त ४० रुपयात

पुणे - पीएमपीच्या प्रवासी भाडे दर आकारणीत आठ वर्षांनंतर बदल करण्यात येणार आहे. त्यातून दैनिक पास स्वस्त आणि सुटसुटीत केले जाणार आहेत. शहराच्या मध्यभागात फिरणाऱ्या मिडी बससाठी ५ रुपये तिकीट होणार असून, ई-बसच्या प्रत्येक स्टेजला पाच रुपयांची दरवाढ सुचविली आहे. त्याचप्रमाणे शहरात आता ४० रुपयांत दिवसभर फिरता येणार आहे.  याबाबत गुरुवारी (ता. १) संचालकांच्या बैठकीत निर्णय होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीची शेवटची भाडेवाढ २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपीचे भाडे ५, १०, १५ आणि २० रुपये अशा टप्प्यांनी केले होते. दरम्यान, कोरोनामुळे पीएमपीची सेवा सहा महिने बंद होती. ३ सप्टेंबर रोजी ती सुरू झाली. मात्र, प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भाडे आकारणीत बदल केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव १ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली. याबाबत पीएमपी प्रशासनाने प्रवासी व स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. पुणे व पिंपरी महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यास त्याची अंमलबजावणी होईल.

नव्या सेवा

  • मिडी बस - पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मिडी बस धावतील. त्यासाठी ५ रुपये तिकीट.
  • एक्‍स्प्रेस बस सेवा - या बस विशिष्ट थांब्यांवरच थांबतील. त्यासाठी वेगळा दर असेल. उदा. कात्रज-निगडी या मार्गावर सध्या २२ थांबे आहेत. त्याऐवजी बस फक्त ६ किंवा ७ थांब्यांवरच थांबेल. म्हणजे एक तासातील प्रवास अर्ध्या तासात होणार. 
  • लिमिटेड बस सेवा - विशिष्ट मार्गांवरील बस विनाथांबा धावतील उदा. धायरी-स्वारगेट, कात्रज-स्वारगेट, हडपसर-स्वारगेट आदी.

असा आहे प्रस्ताव 

  • पुणे शहराच्या मध्यभागात मिडी बसमधून प्रवासासाठी ५ रुपये भाडे 
  • विमानतळ सेवेसाठी अंतरानुसार ५०, १०० आणि १५० रुपये भाडे 
  • ई-पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना ५ टक्के सवलत 
  • एसी ई-बसमधून प्रवासासाठी ५ रुपये दरवाढ 
  • रात्री १२ ते पहाटे ५ च्या प्रवासासाठी ५ रुपये दरवाढ 

पास होणार स्वस्त

  • पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात एक दिवस प्रवासासाठी पास - २० रुपये
  • पुणे महापालिका हद्दीत एक दिवसाचा पास - ४० रुपये (मासिक पास ९०० रु.) 
  • पिंपरी चिंचवड हद्दीसाठी एक दिवसाचा पास - ४० रुपये (मासिक पास ९०० रु.) 
  • पुणे-पिंपरी चिंचवडसाठी एक दिवसाचा पास - ५० रुपये (मासिक पास १२०० रु.) 
  • पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यासाठी एक दिवसाचा पास - ७० रुपये (मासिक पास १५०० रु.)

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच हा मोठा बदल आठ वर्षांनंतर आम्ही करीत आहोत. संचालक मंडळ नक्कीच हा प्रस्ताव मंजूर करून प्रवाशांना दिलासा देईल. 
- शंकर पवार, संचालक, पीएमपी

या काळात भाडे काहीसे स्वस्त झाले आहे, ही चांगली बाब आहे. प्रवासी वाढल्यास सेवाही दर्जेदार मिळावी. एसी बसने प्रवास करायचा असल्यास ५ रुपये जादा भाडे द्यायला हरकत नाही. 
- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

प्रवासी भाड्याचे सुसूत्रीकरण स्वागतार्ह आहे. पास स्वस्त करण्याचे धोरण व्यावहारिक आहे. एसी बसमुळे तोटा वाढेल, अशी भीती वाटते. 
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com