Budget 2021 | सर्वसामान्यांची पिळवणूक करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण 

Budget 2021 | सर्वसामान्यांची पिळवणूक करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण 

मुंबई - कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या; पण केंद्र सरकारने दिशाहीन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांची, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि उद्योजकांची आणखी पिळवणूक करण्याचे काम केले, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. 

चव्हाण म्हणाले, की प्राप्तिकर रचनेत कोणतेही बदल न झाल्याने मध्यमवर्गीय व नोकरदार कमालीचे नाराज आहेत. कृषी क्षेत्रासाठी केवळ तीन हजार कोटींची वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. कोरोनाच्या काळात वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार निर्मितीक्षम पावले उचलण्याची गरज होती. त्याचाही अभाव दिसून आला आहे. मनरेगाची मागणी वाढते आहे; पण ग्रामीण जनतेच्या हाताला काम देणाऱ्या या योजनेबद्दल अर्थसंकल्पीय भाषणात चकार शब्दही काढण्यात आलेला नाही. सर्वाधिक वेगाने रोजगारनिर्मिती करणाऱ्या सेवा क्षेत्राला जीसएटीतून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. जीएसटीच्या यंत्रणेतील दोष अजून दूर झालेले नाहीत. या यंत्रणेमुळे लहान व्यापारी जेरीस आले आहेत. या सदोष यंत्रणेचा त्यांना अकारण आर्थिक फटका सोसावा लागतो आहे. जीएसटीचे दर कमी करून ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याची व बाजारातील मागणी वाढवण्याची गरज होती. त्यादृष्टीनेही अर्थसंकल्पात ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. उच्चांकी भावावर पोहोचलेल्या पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठी करकपातीची अपेक्षाही केंद्र सरकारने झिडकारली आहे. राजकोषीय तूट वाढली असून, पुढील काळात महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार हे स्पष्टपणे दिसते आहे, असेही ते म्हणाले. 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणा! 
पहिले डिजिटल बजेट असा गवगवा होत असलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी निराशाजनक, कोणतीही दिशा नसलेला आहे. पश्‍चिम बंगालसारख्या काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मतदारांना आकर्षित करणाऱ्या काही घोषणा करण्यात आल्या आहेत. अशाच अनेक घोषणा अनेक राज्यांच्या निवडणुकांपूर्वी करण्यात आल्या होत्या, पण पुढे त्याचे काय झाले ते संपूर्ण देशाने अनुभवले आहे. त्यामुळे या घोषणांची कितपत आणि केव्हा पूर्तता होईल हे अनिश्‍चित आहे, अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केली

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Budget 2021 Budget that exploits the common man: Ashok Chavan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com