‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अभिजित दीपके यांच्या कल्पनेला समाजमाध्यमांवर प्रचंड पाठिंबा मिळताना दिसतो. ‘साम टीव्ही’ने घेतलेल्या त्याच्या मुलाखतीचा संपादित अंश. .‘कॉकरोच जनता पार्टी’ची कल्पना तुम्हाला कशी सुचली?अभिजित दीपकेः ही कल्पना नव्हे राग होता. व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना सरन्यायाधीशांनी ‘कॉक्रोच’ (झुरळ)ची उपमा देणारी जी टिप्पणी केली, त्यामुळे मनात प्रश्न आला की, सरन्यायाधीश हे घटनेचे राखणकर्ते असतात; घटनेनेच दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क बजावणाऱ्यांच्या विरोधात ते कसे बोलू शकतात? या रागातून मग मी ‘एक्स’वर लिहिले की, जर हे सगळ्यांना ‘कॉक्रोच’ म्हणताहेत, तर व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे सगळे ‘कॉक्रोच’ एकत्र आले तर काय होईल? मग मी गमतीनेच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ असा उल्लेख केला. ‘बेरोजगार’, ‘आळशी’ आणि ‘दिवसभर ऑनलाइन असणे’ हे निकष नमूद केले. त्यास भरपूर प्रतिसाद मिळाला. कालपर्यंत भाजपचे इन्स्टाग्रामवर ८७ लाख फॉलोअर होते. आज ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ९४ लाख ‘फॉलोअर’ झाले.. हा अनपेक्षित प्रतिसाद पाहून तुम्ही राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करणार का?हे बघा, असे काही करणे फार घाईचे होईल. मी हे काही नियोजनाने केलेले नव्हते. मला घाई नाही. आधी सगळ्यांची मते नीट जाणून घेईन. खरे तर ही ‘ॲक्सिडेंटल पार्टी’ म्हणता येईल. कारण तीन, चारच दिवस झालेले आहेत हे सगळं होऊन. मी तरुणांना विचारेन, की तुमच्या समस्या काय आहेत? कारण हे कोणताही पक्ष विचारत नाहीये. सरकारी विचारत नाहीये. कशामुळे युवकांत वैफल्य आहे, याची माहिती घेईन. त्याशिवाय काही ‘सोल्युशन’ देणं योग्य होणार नाही. राजकारण कुठे ना कुठे बदलावे लागेल. पण आधी लोकांचे; विशेषतः तरुणांचे ऐकू.. राजकारण बदलण्याची गरज तुम्ही व्यक्त केली आहे. प्रतिसाद देणारे तरुण तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहात आहेत. तुम्ही खरोखर चळवळ सुरू करण्याच्या विचारात आहात का?अनेकांचे मला जे संदेश आले, त्यांची हीच भावना आहे की आता मागे हटायचे नाही. सगळ्यांना काहीतरी करायचे आहे. ही चळवळ आम्ही नक्कीच पुढे नेणार आणि युवकांचे मुद्दे उचलत राहणार. सरकारला प्रश्न विचारणार.. ‘आप’बरोबर तुम्ही होतात; आणि त्यामुळे तुम्ही भाजपाला विरोध करताय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?हे बघा मी ‘आप’बरोबर काम केले हे लपवीत नाही. मला ते लपवायचं असतं तर मी राघव चढ्ढासारख्यांचे ट्वीट डिलीट केले असते. मी तसे केले नाही. मी तसे केले असते तर कोणी भरोसा ठेवणार नाही. मागच्या दोन वर्षापासून मी अमेरिकेत राहतोय. कोणताच पक्ष युवकांचे मुद्दे उचलत नाही. आता मात्र त्यांना या मुद्द्यांना सामोरे जावेच लागेल. ती वेळ आलेली आहे.. ‘आप’बरोबरचे काम तुम्ही पडद्यामागून केले. कशा पद्धतीने पक्ष काम करतात याची बारीकसारीक माहिती तुम्हाला मिळाली असेल. याच माध्यमातून पुढे जाण्याचा विचार तुम्ही करताय का?आपण राजकारणाकडे फक्त निवडणुकीपुरते पाहतो, हे चूक आहे. ''नीट’ पेपरफुटीचा गैरव्यवहार घडला, अशा पद्धतीने जर प्रश्नपत्रिका फुटत असतील तर तरुणांची स्वप्ने उद्ध्वस्त होतात. या परिस्थितीला कुचकामी व्यवस्था कारणीभूत ठरत असते. या व्यवस्थेला पोसणारे राजकीय नेते असतात. ‘नीट’ची तयारी करणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. उद्या तो डॉक्टर झाला असता. डॉक्टर होऊन दुसऱ्या लोकांचे जीव वाचवायचे स्वप्न जो बघत होता, त्याला स्वतःचा जीव द्यावा लागावा, याच्यापेक्षा वाईट काय असू शकते? शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा रेटा का निर्माण होत नाही? सरकारच्या गैरकारभारामुळे लोकांचा जीव चालला तरी राजीनामा देत नाहीत. मग उत्तरदायित्व गेले कुठे?. तुम्ही म्हणालात की, शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. तर या मागणीसाठी लोकांनी नेमके काय केले पाहिजे?आम्ही पुढाकार घेऊन लोकांना एक ‘लिंक’ पाठवणार. सर्व ९४ लाख फॉलोअरकडून या मागणीला असलेला पाठिंबा व्यक्त झाला पाहिजे. त्यांनी सांगायचं की शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कोणी आपले काही बिघडवू शकत नाही, ही सत्ताधाऱ्यांची धारणा असेल तर ही बाब गंभीर आहे. पोलिस भरतीच्या परीक्षेचेही पेपर फुटतात. चाळीस लाखांवर मुले अशा परीक्षांना बसतात. तुम्ही परीक्षा रद्द करून नवी तारीख जाहीर करून मोकळे होता. वर्ष उलटले तरी निकाल जाहीर होत नाहीत. वयोमर्यादा उलटण्याच्या धास्तीखाली मुले असतात. त्यांच्या आयुष्याशी खेळ केला जातो. हे सगळं असंच किती काळ चालणार?. तुम्ही महाराष्ट्रातले आहात. तुमची जी बंडखोर वृत्ती आहे, ती नेमकी तुम्हाला कुणाकडून मिळाली?छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल मी लहानपणापासून ऐकत आलोय. त्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवलेला आहे. हा वारसा आहे. या वातावरणात वाढल्यामुळे माझ्यात हे आलेले असेल.. तुमच्या जाहीरनाम्यात म्हटलेले आहे की पक्षांतर करणाऱ्यांवर वीस वर्षे निवडणूक बंदी घातली पाहिजे.मला दुसरं कुठेच उदाहरण द्यायची गरज नाहीये. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसारखे पक्ष फोडले गेले. महाराष्ट्रातले कित्येक प्रकल्प गुजरातकडे गेलेले आहेत. या प्रकारांना विरोध करायला महाराष्ट्रातील पक्ष प्रबळ नकोत का? जेव्हा व्यवस्थेविरोधात आवाज कुणीतरी उठवते, तेव्हा त्याला दाबले जाते. अर्थात मला माझा ‘कल्ट’ निर्माण नाही करायचा. कोणी अंधपणे माझ्यामागे यावे असे वाटत नाही. घटनेच्या चौकटीतच मला चळवळ चालवायची आहे. तुम्ही बांगलादेश आणि नेपाळसारखं करणार का, असे विचारले जाते. मी म्हणतो, अजिबात नाही. राज्यघटनेच्या मर्यादेतच चळवळ चालवायची आहे.. राजकारणात घरातलं कोणी होतं का?कोणीच नाही. माझं मूळ गाव पिंपरी आहे. माझे आजोबा शेतकरी होते. एका दलित परिवारातून आलो आहे. डॉ. आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. तो नसता दिला तर माझे वडील शिक्षण घेऊ शकले नसते आणि जर त्यांना शिक्षण मिळालं नसतं तर मी अमेरिकेला कुठून आलो असतो? खूपच गरीब घरात त्यांचा जन्म झालेला होता आणि ते दुष्काळात वाढलेले होते. आजी सांगते की, कधी कधी घरात खायला भाकरीही नसायच्या.. तुझे अकाउंट ‘हॅक’ करण्याचाही प्रयत्न होतोय. भीती नाही वाटत नाही का या सगळ्या गोष्टींची?नाही. कशाला घाबरून राहायचे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले अधिकार जोपर्यंत आहेत, तोपर्यंत मी बोलत राहणार..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.