कोविड लस कशी, कधी, कुणाला?

Covid-19
Covid-19

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे झायडस कॅडीला, भारत बायोटेक आणि सिरम या कंपन्याच्या लस निर्मितीचा आढावा घेतला. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यात गुंतलेल्या प्रश्‍नांचा वेध.

सध्या अनेक कोविड लसी फेज तीनमध्ये आहेत. म्हणजे दोन- तीन महिन्यांत लस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. मात्र ती येताच आपण कोविडमुक्तीकडे जाऊ, हा समज आहे. तो तपासून घेतला पाहिजे. त्यासाठी लशीची क्षमता, मर्यादा लक्षात घ्यायला हवी. अन्यथा भीतीचा लाभ उठवत मार्केट वैज्ञानिक सत्याचे अपहरण करू शकते. लसीबद्दल वेगवेगळी संशोधने रोज नवी माहिती सादर करताहेत. त्यामुळे सुरेश भटांच्या शब्दांत ‘एक माझा प्रश्न आणि लाख येती उत्तरे हे खरे की ते खरे की ते खरे की हे खरे ?‘ अशी आपली अवस्था होते. 

लस म्हणजे रामबाण उपाय नव्हे
लस म्हणजे प्रत्येकाला दीर्घकाळ टिकणारी प्रभावी प्रतिकारशक्ती देणारी, कमीत कमी दुष्परिणाम असणारी म्हणजे सुरक्षित, सोप्या शीतसाखळी उपकरणांनी साठवता येणारी आणि स्वस्त असली पाहिजे. तशी ती विकसित करणे सोपे नसते. शिवाय लस म्हणजे कोविडवरील रामबाण उपाय नव्हे !

संशोधनाची प्रक्रिया अद्याप अपूर्ण
सध्या सिरम, फायझर, मॉडर्ना, भारत बायोटेक अशा अनेक कंपन्याच्या लशी लवकर उपलब्ध होतील,असे दिसते. तथापि त्या कितपत गुणकारी आहेत, याबद्दल अद्याप पूर्ण माहिती नाही. प्रत्येक कंपनी लसीचे संशोधन स्वतः करते आहे. अद्यापतरी ते इतर संशोधकांनी तपासलेले नाही. याशिवाय प्रत्येक लसीवर संशोधन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असल्याने तुलनात्मक माहिती उपलब्ध नाही. वेगवेगळ्या अभ्यासात या लशी ६०ते ९० टक्के प्रभावशाली असल्याचे कंपन्या सांगतात.आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुहाने हे दावे तपासून पाहिल्याशिवाय त्यातील खरेखोटेपणा कळणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिकारशक्तीचे प्रमाण किती?
प्रतिकारशक्ती लस घेतल्यानंतर किती काळाने विकसित होते आणि ती किती काळ टिकते याबद्दलही अजून नेमकी माहिती नाही. इन्फ्लुएंझा लसीमुळे ( स्वाईनफ्ल्यू ) मिळणारी प्रतिकारशक्ती ८ ते १२ महिने टिकते, त्यामुळे ती लस दरवर्षी घ्यावी लागते. तशी माहिती या लसीबद्दल अद्याप नाही. ही लस कोविड आजार प्रतिबंधामध्ये काही प्रमाणात आपल्याला साह्यभूत ठरु शकते.

लस कधी आणि कोणाला ?
नवीन लस साधारणतः फेब्रुवारी- मार्च २०२१मध्ये उपलब्ध होईल. विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘कोविड- इंडिया नॅशनल सुपर मॉडेल’ या तज्ज्ञ गटाने ऑक्‍टोबरमध्ये दिलेल्या अहवालानुसार, भारतामधील कोरोनाचा उद्रेक फेब्रुवारीअखेरपर्यंत शांत होईल आणि त्यानंतर रुग्ण तुरळकपणे आढळतील. लस हातात पडेपर्यंत कोविड कमी झालेला असेल, असा अंदाज आहे. सध्या आपण लस सर्वांना द्यावी, असे म्हणतो आहोत; पण एकूण लोकसंख्या लक्षात घेतली तर एवढया मोठया प्रमाणावर उत्पादन व्हायला अवधी लागेल. शिवाय फायझर किंवा मॉडर्ना कंपनीच्या लसीची किंमत प्रति डोस २० ते ४०  डॉलरपर्यंत असेल. शिवाय या लसी साठवण्याकरिता उणे २० ते उणे७० अंश सेल्सियस तपमान असणा-या डीप फ्रीजरची गरज असते. एकूणच हे बरेच खर्चिक प्रकरण आहे. त्या तुलनेत ऑक्‍सफर्ड ॲस्ट्राझिनिकाने विकसित केलेली लस ही ३ डॉलर प्रतिडोस उपलब्ध होईल, असे दिसते. याशिवाय तिच्या साठवणुकीकरिता नेहमीचा रेफ्रिजरेटर पुरेसा आहे.

लसीकरणाचा  प्राधान्यक्रम
फायझर कंपनीचे माजी उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध क्‍लिनिकल इम्युनॉलॉजिस्ट माइक एडन यांच्या मते मुळात सर्वांना लस गरजेची नाही. त्यांनी दिलेले कारण तर्कशुद्ध आहे. सध्या ३०ते३२ टक्के लोकांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. या नवीन करोना विषाणूशिवाय नेहमीच्या सर्दीस कारणीभूत असणारे जे जुने चार कोरोना विषाणू आहेत, त्यांचा संसर्ग दरवर्षी आपल्यापैकी अनेकांना होत असतो. या जुन्या कोरोना विषाणूंमुळे मिळणारी प्रतिकारशक्तीदेखील नवीन कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पुरेशी आहे. याशिवाय दहा वर्षाखालील मुले सुमारे १० ते १२ टक्के आहेत, ज्यांना या आजाराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती (इनेट इम्युनिटी) आहे. म्हणजेच बिलकुल प्रतिकारशक्ती नसलेल्या सुमारे ३० टक्के लोकांना लसीची गरज सर्वाधिक आहे. हे लोक नेमके ओळखणे सोपे नाही. सध्या आपण आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल, ५० वर्षांवरील लोक आणि  ५० वर्षांखालील पण अतिजोखमीचे आजार असणारे लोक असा लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवतो आहोत. अर्थात नैसर्गिक संसर्गामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती प्रत्येक व्यक्तीत सारखी नसते. अनेकदा ती अल्पजीवी असू शकते म्हणून नैसर्गिक संसर्ग झालेल्या व्यक्तींनीही लस घेतली पाहिजे, असे डॉ. के श्रीनाथ रेड्डीनी म्हटले आहे.

सुरक्षेचा पैलू
प्रत्येक लसीचे काही दुष्परिणाम असतात. यातील बहुतांश सौम्य असतात, हे खरे असले तरी सर्वसामान्यपणे एखादी लस निर्धोकपणे विकसित होण्याचा कालावधी हा किमान १० वर्षांचा असतो, तो आपण या आणीबाणीच्या काळात अवघ्या वर्ष दीड वर्षावर आणला आहे. अनेकदा मोठया कंपन्या आपल्या उत्पादनाच्या दुष्परिणामाविषयी पुरेशा पारदर्शक नसतात. हे लक्षात घेतले तर सुरक्षेबाबत छातीठोकपणे सांगणे आज सोपे नाही. त्यात काही कंपन्यांमार्फत लसीसाठी ‘मेसेंजर आर एन ए’सारखा प्लॅटफॉर्म जगात पहिल्यांदाच वापरला जात आहे. त्यामुळे नवीन लसींच्या सुरक्षेसाठी अन्न-औषध विभागाला काळजी घ्यावी लागेल. या पार्श्वभूमीवर लस घेणे सक्तीचे करावे की ते ऐच्छिक असावे, याचा निर्णय घ्यावा लागेल. ही लस गरजू व गरीब जनतेला मोफत उपलब्ध करुन देणे, हेही मोठे आव्हान आहे. 

ऑगस्ट- सप्टेंबर २०२१ पर्यंत २५ ते ३० कोटी जनतेपर्यंत ही लस पोहचविण्याचे नियोजन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. थोडक्‍यात कोरोनाविरुद्धची लस आपल्या हातात येते आहे, या महासाथीविरुद्धच्या लढ्यात ही एक आशादायी घटना आहे. तथापि या लसीचा वापर आपण विज्ञानाच्या आधारावर विवेक, मानवता आणि तर्कबुद्धी शाबूत ठेवून केला पाहिजे.

(लेखक ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र’चे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com