अग्रलेख : मतमतांचे भोवरे

देशासमोरील ज्वलंत प्रश्‍नांऐवजी भावनिक मुद्द्यांना हात घालून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न ध्रुवीकरणाच्या दिशेने नेणारा आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal

देशासमोरील ज्वलंत प्रश्‍नांऐवजी भावनिक मुद्द्यांना हात घालून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न ध्रुवीकरणाच्या दिशेने नेणारा आहे.

सर्वसामान्य लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवर आणि देशापुढील, विविध राज्यांपुढील समस्यांवर मंथन होऊन लोकसभा निवडणुकीत काही महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर येतील, ही अपेक्षा पुन्हा फोल ठरताना दिसत आहे. खरे तर देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक असतानाही प्रचारातील चर्चेची गाडी भावनिकता, अस्मिताबाजी, ध्रुवीकरण यांच्याच मार्गाने चाललेली असून ती योग्य मार्गावर आणण्यासाठी कोणाला साकडे घालावे, असा प्रश्न आहे.

याचे कारण वरिष्ठ नेतेमंडळीच या धुळवडीत भाग घेत आहेत. त्यात पंतप्रधान पदावरील नरेंद्र मोदी हेही सहभागी आहेत. अशावेळी प्रचाराचा स्तर खालावला नाही तरच नवल. दीर्घकाळ प्रस्थापित असलेल्या काँग्रेसला सत्तेवरून दूर करून आपले बस्तान बसवणे ही अर्थातच सोपी गोष्ट नव्हती, त्यामुळे २०१४च्या निवडणुकीतील आक्रमक आणि भडक प्रचाराची रणनीती काही प्रमाणात समजून घेता येते.

पण दहा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही जर तेच युक्तिवाद आणि तोच आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळला जात असेल तर गेल्या दहा वर्षांत या लोकशाही देशाने प्रगती केली म्हणजे नेमके काय केले, असा प्रश्न पडतो. मोदींच्या भाषणांमधून मासे आणि मटणावरून शेरेबाजी झाली, कॉँग्रेसवर मुस्लिमधार्जिणेपणाच्या आरोपाचा पाढा वाचून झाला. हे कमी म्हणूनच की, काय मंगळसूत्राचीही उठाठेव केली गेली.

धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणुका लढवता येत नाहीत आणि देशाचे शीर्षस्थ नेतृत्व दरवेळी त्याचाच आधार घेते, हे दुर्दैवी वास्तव आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचारविरोधी असंतोषावर स्वार होऊन मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले.

शंभर दिवसांत कायापालट घडवण्याची ग्वाही देणारे मोदी दहा वर्षांनंतरही पुन्हा संधी मागत आहेत आणि ती मागताना आपल्या कामगिरीचा दाखला देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेत आहेत. निवडणूक हा अलीकडच्या काळात जात आणि धर्माचा खेळ बनला आहे. उमेदवारी वाटपापासून जात आणि धर्म सर्वच पक्षांच्या केंद्रस्थानी असतात, हे वास्तव आहे. ते बदलण्याचा कोणीही गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत नाही.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी चैत्री नवरात्राच्या पहिल्या दिवशी मासे खात असतानाचा व्हिडिओ टाकला. त्याची अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया आल्यावर, ‘‘भाजपच्या बुद्ध्यांकाची चाचणी करण्यासाठी आपण हा व्हिडिओ टाकला’’, असे त्यांनी सांगितले.

या व्हिडिओवर बिहार भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या; परंतु मोदी यांनीही, श्रावणात मटण खाता, नवरात्रात मासे खाता, लोकांच्या भावनांशी खेळता, ही ‘मुगलिया सोच’असल्याची टीका केली. लोकांच्या खाण्यापिण्यावर निर्बंध आणण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याची टीका त्यावर विरोधकांनी केली.

मासे आणि मटणाचा हा विषय मागे पडतानाच राजस्थानातील बांसवाडा येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्याचा आधार घेऊन, केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुले असलेल्या ‘घुसखोरां’ना संपत्तीचे फेरवाटप होईल; तसेच तुमच्याकडील सोने,दागदागिने काढून घेताना मंगळसूत्रेही हिरावून घेतली जातील, असे विधान केले.

निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर कसलाही विधिनिषेध ठेवायचा नाही, असा या नेत्यांनी पण केला आहे की काय, असे वाटते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या २००६मधील, म्हणजे अठरा वर्षांपूर्वीच्या भाषणातील विधानांचा मोडकातोडका संदर्भ घेऊन मोदींनी आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. इथे केवळ त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचाच प्रयत्न केलेला नाही, तर महिलांच्या मनात भीतीही पेरण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसने त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असली तरी त्यावर काहीही होणार नाही, याची सर्व संबंधितांना खात्री आहे. मंगळसूत्र हिरावून घेण्याच्या विधानावर काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी यांनी ‘‘देश युद्धाला सामोरा जात असताना इंदिरा गांधींनी त्यांचे मंगळसूत्र आणि दागिने दान केले होते. माझ्या आईने तिचे मंगळसूत्र या देशासाठी गमावले,’’ असे उत्तर दिले.

हे होत असतानाच काँग्रेसच्या थिंक टँकमधील नेते सॅम पित्रोदा यांनी भाजपच्या हाती नवेच कोलित दिले आहे. संपत्तीच्या वाटपासंदर्भात अमेरिकेतला दाखला देऊन त्यांनी काँग्रेसला अडचणीत आणले. अर्थात, काँग्रेसने याविषयी सारवासारवही केली. सत्य-असत्याचे मिश्रण, कल्पनाविस्तार, विपर्यास अशा विविध आयुधांचा वापर करून ‘नरेटिव’ तयार करण्यात मोदी हे किती मातब्बर आहेत, हे एव्हाना सगळ्यांना कळून चुकले आहे. संपत्तीच्या पुनर्वितरणाचा मुद्दा त्यामुळेच त्यांनी थेट मंगळसूत्रापर्यंत नेऊन भिडवला. एकूणच चर्चेची भरकटलेली गाडी पुन्हा रूळावर येणार का, हा प्रश्‍नच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com