ढिंग टांग : जाणार म्हंजे जाणारच! 

ब्रिटिश नंदी
Wednesday, 22 July 2020

""आमच्या प्रस्थानाची तयारी करा!चार हजार घोडदळ,वीस हजार पदाती आणि बत्तीस गजशाळेसह आम्ही सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसमवेत निघू! मजल दरमजल करीत पोहोचूं!!,''राजियांनी ऐलान केले.

""जाणार म्हंजे जाणारच. जायलाच हवं. किंबहुना, नाही गेलं तर तो गुन्हा ठरेल. तिथं जाणं आमचं कर्तव्यच आहे. आम्ही नाही जाणार तर कोण जाणार? आम्हीच जाणार! जाणार म्हंजे जाणारच!,'' एक हात कमरेच्या तलवारीवर ठेवून दुसऱ्या हाताने मूठ वळून राजे म्हणाले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे सूर्यतेज फांकले होते. 

""आपले बोल, देवावरचे फूल, महाराज!,'' कुणीतरी म्हणाले. हे कुणीतरी म्हंजे आम्हीच बरेका!! आम्ही आणि उपस्थित सर्व (निवडक) मावळ्यांनी गुडघ्यावर बैसोन आज्ञा शिरसावंद्य केली. कुठल्याही मोहिमेतले मावळे हे कायम निवडकच असतात, हे कोणीही सांगेल! आम्हीही निवडकच आहो!! असो. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

""आमच्या प्रस्थानाची तयारी करा! चार हजार घोडदळ, वीस हजार पदाती आणि बत्तीस गजशाळेसह आम्ही सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसमवेत निघू! मजल दरमजल करीत पोहोचूं!!,'' राजियांनी ऐलान केले. लौकरच मोहीमशीर व्हावयाचे या विचाराने आमच्या हुर्दात उचंबळले. (खुलासा : मावळ्यांचे हुर्द असते, हृदय नव्हे!! ते नेहमी उचंबळते!! असो.) 

""मुहूर्त कधीचा आहे?,'' मुहूर्ताचा सवाल करताना त्यांनी मान गर्रकन फिरवली. मान गर्रकन फिरवल्यामुळे किंचित अवटळली आणि त्यांचे मुखातून "आयाईग्गं' ऐसे उद्गार उमटले. गोटात हलकल्लोळ उडाला. "राजियांची मान अवघडली! अवघडली!' ऐसा गोंधळ जाहला. कुणी शेकायची पिशवी घेवोन धावले, कुणी दुखदबाव लेप घोटावयास घेतला. कुणी खापर भाजून शेक घेण्यासाठी मडके फोडिले. 

ढिंग टांग : डर के आगे जीत है!

""अरे, कुणीतरी लाटणे आणा लाटणें!'' आम्ही ओरडलो. दुजाच कुणीतरी मुदपाकखान्यात लाटणे आणण्यासाठी धावला. तथापि, लाटणे आणण्याची सूचना कानी पडतांच राजे दचकून उठून बसले. 

""ल..ल..लाटणं कशाला? छे, छे!!,'' त्यांनी हादरलेल्या आवाजात विचारले. लाटणे आणायला धावलेला कुणीतरी हात हलवीत परत आला. राजियांनी उपस्थितांस दोनतीनदा मान उजवीकडोन डावीकडे आणि डावीकडोन उजवीकडे फिरवोन सारे काही आलबेल असल्याचे दाखवोन दिले आणि उडालेला गोंधळ मोठ्या धोरणीपणाने शमविला. 

""मुहूर्त कधीचा आहे, असे आम्ही पुसत होतो!'' राजियांनी स्मरण करोन दिले. मान आणि लाटण्याच्या गोंधळात आमचे स्मरण पुसट झाले होते, हे खरेच. 

""प्रमादीनाम संवत्सर, श्रीशके 1942 श्रावण कृष्ण द्वितीयेचा शुभ दिवस आहे, राजे!'' आम्ही क्‍यालिंडरासमोर उभे राहोन निकाल दिला. श्रावण कृष्ण द्वितीयेसारखा शुभमुहूर्त दुजा नाही. एखाद्याने घर बांधावयास काढले तर या दिवशी कुदळ मारावी!! वास्तु युगानुयुगे टिकते!! 

ढिंग टांग :  चलो अयोध्या!

""बाप रे! अवधी कमी आहे, सत्त्वर निघावयास हवे! सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसमवेत आणि लवाजम्यासह जायचे म्हंजे एवढा काळ लागणारच!,'' राजियांनी विचारपूर्वक निर्णय दिला. अवघा पंधरवडा तर उरला आणि पल्ला तर मोठा!! काय क्रावे? 

""परंतु, राजे, निमंत्रण अद्याप पोंचतें झालेले नाही! पाठवलंय असे सांगतात नुसते!'' आम्ही सावधगिरीने म्हणालो. 

""आम्हाला तेथे जाण्यास निमंत्रण लागते की काय? नाव सोडा! आम्ही जाणार म्हंजे जाणारच!!,'' करारी मुद्रेने आणि ताठ मानेने राजे म्हणाले. आता पुढले काही दिवस ही मान अशीच एका दिशेने कलती राहणार, या कल्पनेने ते थोडेसे गोरेमोरे झाले इतकेच. 

ढिंग टांग : वाघाचे पंजे!

अखेर सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसमवेत जायचे की नाही, याचा निर्णय नंतर घेऊ, असा निर्णय होवोन सभा पांगली. सभा पांगता पांगता राजियांनी दुखदबाव लेप मागवला! 

""काहीही असो! मानभंग होता होता वांचला!,'' कुणीतरी म्हणाले. आम्ही फक्त मान डोलावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about ayodhya