esakal | ढिंग टांग : मैं और मेरा ट्विटर!
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi tweet

हल्ली शत्रुत्त्व फारच वाढत चाललंय बेटा! हे चांगलं लक्षण नाही! समाजात तेढ, शेतकऱ्यांशी तेढ, मजुरांशी तेढ, राजकारणात तेढ...सगळीकडेच तेढच तेढ! आपण पिढीचं राजकारण केलं, हे तेढीचं राजकारण करताहेत!

ढिंग टांग : मैं और मेरा ट्विटर!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (कंटाळलेल्या सुरात) प्रवासाने दमला नाहीस का रे?

बेटा : (उजळ चेहऱ्याने) छे, मला प्रवास खूप आवडतो! म्हणून तर दरवर्षी मी परदेशी प्रवासाला जातोच! सुट्टी टाकून!!

मम्मामॅडम : (चिंताग्रस्त आवाजात) इथं इंडियात किती कामं पडली आहेत! एक मिनिट विश्रांती नाही जिवाला!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेटा : मम्मा, मला एक सांग, इथं एवढी शांतता का आहे? आपल्या सरकारने लॉकडाऊन वाढवलाय का?

मम्मामॅडम : (खदखदत्या संतापानं) गेली सहा वर्षं या देशात लॉकडाऊन तर आहे!

बेटा : (अचंब्यानं) डोण्ट टेल मी! सिक्‍स इयर्स?

मम्मामॅडम : (कोरडेपणानं) आपल्यासाठी गेली सहाएक वर्षं लॉकडाऊनसारखीच गेली! नाही का? कधी एकदा ही कमळवाल्यांची हुकूमशाही थांबणार कुणास ठाऊक! वीट आलाय अगदी!!  

बेटा : (सात्त्विक संतापानं ) मी पहिल्यापासून सांगतोय, या लोकांनी देशाची वाट लावायला घेतली आहे! अर्थव्यवस्थेचा तर बोजवारा उडाला आहे! मी मधल्या काळात इतक्‍या अर्थतज्ञांशी बोललो, सगळे हेच सांगत होते! किंबहुना, असं सांगणाऱ्यांशीच मी बोलत होतो!

मम्मामॅडम : (मर्मभेदीपणाने) आपण दोघेही परदेशात असताना या लोकांनी अत्यंत दुष्टपणे शेतकरी विरोधी विधेयकं जोरजबरदस्तीने मंजूर करुन घेतली!! बरं, झालं आपण नेमक्‍या याच वेळेला परदेशी जाऊन आलो ते! माझ्याच्याने ही लोकशाहीची थट्टा पाहवली नसती!!

बेटा : (निषेध करत) मी इथं असतो, तर हे खचितच होऊ दिलं नसतं! मी इथे असतो तर दाखवला असता इंगा!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मम्मामॅडम : ( मनातल्या मनात नोंद घेत)...आपल्या अनुपस्थितीचा त्या कमळवाल्यांनी गैरफायदा घेतला!  पुढल्या वेळेला स्ट्रॅटजी बदलली पाहिजे!

बेटा : सोडतो की काय त्यांना! लागोपाठ  अर्धाएक डझन व्हिडिओ टाकून मी त्यांना सळो की पळो करुन सोडीन! 

मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) त्यानं काय होणार आहे? आपल्याला फुलटाइम विरोध करणाऱ्या नेत्याची गरज आहे!! 

बेटा : (चिडून) पण हे लोक असं वागू लागले आहेत की जणू काही आपण शत्रूच आहोत!

मम्मामॅडम : (हताश होत्सात्या...) हल्ली शत्रुत्त्व फारच वाढत चाललंय बेटा! हे चांगलं लक्षण नाही! समाजात तेढ, शेतकऱ्यांशी तेढ, मजुरांशी तेढ, राजकारणात तेढ...सगळीकडेच तेढच तेढ! आपण पिढीचं राजकारण केलं, हे तेढीचं राजकारण करताहेत!

बेटा : (गंभीरपणाने दुजोरा देत) तेच म्हणतोय मी! आपण इतकी वर्ष सत्तेत राहून भाईचाऱ्यानं राज्य केलं! शेजारी देशांशी अतिशय चांगले संबंध ठेवले! यांनी सगळ्यांशी भांडणं करुन ठेवली आहेत! शेजाऱ्यांशी इतका पंगा घेऊन चालतं का?

मम्मामॅडम : हे कुठं बाहेर बोलला नाहीस ना?

बेटा : (निक्षून सांगत) कुठ्ठेही नाही! फक्त ट्विटरवर टाकलंय!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) ओह गॉड! 

बेटा : (दुर्लक्ष करत) आत्ता या घटकेला आपले सगळे शेजारी दुखावलेले आहेत! कोणामुळे दुखावले? भाईचाऱ्याचं राजकारण केलं पाहिजे, भाईचाऱ्याचं!! 

मम्मामॅडम : (कौतुकानं) तू फुलटाइम नेतृत्त्व करायला लागलास की कर हो भाईचाऱ्याचं राजकारण!!

बेटा : (विजयी मुद्रेने) बघशीलच आता! मैं और मेरा ट्विटर...कमळ कंपनी का बंद शटर! अब मुझे कोई नही रोक सकता!