ढिंग टांग : गन से फोन तक!

Dhing-Tang
Dhing-Tang

खरे सांगायचे तर आम्हाला प्रसिद्धीचे भयंकर वावडे आहे. लोकांच्या पुढे पुढे करून केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे उद्योग आम्ही कधीही करत नाही. सावलीला उभे राहून मागल्या मागे कळसूत्र हलवून कार्य सिद्धी नेण्यात आमचा हातखंडा आहे आणि तेच आम्हाला आवडते. सदैव पडद्याआड राहून विद्यार्थ्यांस ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगाव्यात, त्यांना ‘यशस्वी भव’ असा (मुखरसयुक्त) तोंड भरून आशीर्वाद द्यावा, हा आमचा खरा पिंड आहे. म्हणूनच की काय कोण जाणे, दिल्लीच्या वर्तुळात आम्हाला ‘गुरुजी’ असे आदराने संबोधले जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या घरानजीकचा पानवालादेखील येता जाता आदराने हटकतो : ‘‘गुरुजी, उधार कब दोगेऽऽऽ?’’ आम्ही मान डोलावून ‘‘देंगे देंगे’’ असे आश्वासन देतो आणि त्यास नवे पान लगावण्यास फर्मावतो. किंचित घुश्‍शात असला तर तो नाही म्हंजे नाही देत पान!! मग आम्ही निमूटपणाने (चिन्यांसारखी) माघार घेतो.
आपल्याच तोंडाने आपली स्तुती काय करायची? जो करी स्वत:ची स्तुती, तो येक मूर्ख!!

पण तरीही तुम्हाला म्हणून सांगतो. कान इकडे करा, ऐका! परवाच्या दिशी चिन्यांनी लडाखमधून काढता पाय घेतलान! कोणामुळे? आमच्यामुळे!! एरवी आगळीक करणाऱ्या त्या चपट्यांचे नाक कोणी कापलेन? आम्ही!! ती एक वेगळीच ष्टोरी आहे.

त्याचे असे झाले की, परवाच्या दिशी, आईतवारी गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही देशविदेशातून अभिवादनाचे आणि आदरभावनेचे फोनसंदेश स्वीकारत होतो. दुपारी जेवण अंमळ जास्त झाल्यामुळे एक तीन-चार तासांची छोटीशी वामकुक्षी घ्यावी म्हणून पडलो होतो.

तेवढ्यात आमचे जुने विद्यार्थी आणि भारताचे सुप्रसिद्ध गुप्तचर अधिकारी जे की डोभालसाहेब यांचा फोन आला. ‘वत्सा, तुजप्रत कल्याण असो’ असे म्हणण्याच्या आधीच त्यांनी चिन्यांच्या चोरट्या वृत्तीचे गाऱ्हाणे गाईले. म्हणाले, ‘‘गुरुजी, काहीही करा, या चिन्यांना सरहद्दीवरून पिटाळण्याची एखादी युक्ती सांगा!’’  आम्ही त्यांस सांगितले, की ‘थेट त्या वांग्याला फोन लावा आणि सांगा की आम्ही निरोप दिलाय म्हणावं. निघा इथून!’ चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी हेसुद्धा आमचेच विद्यार्थी! त्याला प्रेमाने आम्ही वांग्या म्हणतो!

वांग यी हे चीनमध्ये राहात असले तरी चिन्यांसारखे फारसे वागत नाहीत. निदान आमच्याशी तरी ते नम्रपणे वागतात. आम्ही जे सांगू ते डोळे मिटून ऐकतात! सारेच चिनी साऱ्या जगाचे डोळे मिटूनच ऐकतात, असा युक्तिवाद कुणी करू पाहील! चिन्यांचे डोळे धड उघडतातच कुठे? पण हा युक्तिवाद तितकासा योग्य नाही. चिनी डोळे मिटून कोणाचेच ऐकत  नाहीत, असा आमचा तरी अनुभव आहे. 

‘वांग्याला फोन लावून आमचे नाव सांग, अस्सा वठणीवर येईल!’ हा आमचा सल्ला कामी आला. डोभालसाहेबांनी अगदी तस्से केलेन! म्हणाले, ‘गुरुजी, तुस्सी ग्रेट हो!’
पुढले सगळे माध्यमांमध्ये छापून आले आहेच. श्रीमान डोभालसाहेबांनी वांग यी यांना फोन केला आणि चिनी चीची करत पळाले, वगैरे! युद्ध जिंकण्यासाठी हल्लीच्या जगात गनची नाही तर फोनची गरज  असते. ‘क्रांतीचा मार्ग गनच्या नळीतून नव्हे, फोनच्या कळीतून जातो’ हे नवे वाक्‍यही आमचेच. माओ यांच्या तत्त्वज्ञानाला आम्ही तूर्त सुधारून घेत आहो.

बाकी, आपलेच कवतिक किती सांगायचे? आम्हाला फार संकोचल्यासारखे होते. क्रेडिट श्रीमान डोभालसाहेबांना मिळाले, मिळू द्यात! त्यात आम्हाला सुखच आहे. श्रेय कोणालाही मिळो, चिन्यांचे संकट तूर्त टळले, याचे आम्हाला समाधान आहे. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com