ढिंग टांग : फाजील गझल!

editorial article dhing tang about common man issues
editorial article dhing tang about common man issues

विश्वाच्या नाकावरती टिच्चून झोपलो आम्ही
बेंबीच्या देठापासुनि खच्चून रेकलो आम्ही

मुंगीने गिळला सूर्य, मी दोंद सावरुनि बसलो,
काळाचे ठायी जेहत्ते, रच्चून जेवलो आम्ही

हे गेंद फुलांचे कोणी, दोरीत ओवले ताजे,
बांधून फास आत्म्याला, गच्चून लटकलो आम्ही

ती वरात होती कुठली, वाजंत्री, ढोल-नगारे,
बेगान्या शादीमध्ये सज्जून नाचलो आम्ही

शिलगावली तयांनी त्यांची विडी सुदैवी,
काडीसमान तेव्हा विझ्झून ‘राख’लो आम्ही

लस देताना ती नर्स, वदली मज ‘‘दुखले का?’’
घालून खालती मान लाज्जून हांसलो आम्ही

पाऊस केवढा पडतो, मौनात चिंबले रान,
तलखीत या झळांनी, भिज्जून चाललो आम्ही

कढईत काय रटरटते, हे रक्त तांबडा रस्सा
नशिबाच्या चुल्यावरती शिज्जून निघालो आम्ही

त्या बंद गर्भगृहाच्याआड बंदिस्त देव अज्ञात,
कोणिही असो मग त्याला भज्जून काढिले आम्ही

हा हमाम कुठला मित्रा, सगळेच इथे निर्वस्त्र
कमरेचे काढून डोके झाक्कून घेतले आम्ही

गादीत आमुच्या दिव्य हे ढेकुण झाले फार
ना जुमानिता मग त्यांना निज्जून राहिलो आम्ही

आयुष्य असे निब्बार अन प्राक्तन झाले ऐदी
मग बथ्थड हे भवितव्य बघ्घून घेतले आम्ही

रात्रीची सोंगे फार, दिवसाचे नाटक झाले
मोफतच्या पासामध्ये गुंग्गून पाहिले आम्ही

हे हळवे फाजील शब्द, फाजील गझल नि शेर,
‘इर्शाद’ असे म्हणण्याचे शिक्कून घेतले आम्ही

जे माना टाकुनि गेले ते सारे पुढे सरकले
रांगेत नंबरासाठी अज्जून तिष्ठलो आम्ही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com