ढिंग टांग : हात आणि हालात...!

नुसते हात हलवून हालात बदलणार नाहीत, वेळीच पावलं उचलली नाहीत, तर पुन्हा हात हलवत परतावं लागेल!!
dhing tang
dhing tangsakal

बेटा : (नेहमीच्या प्रचंड उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!!

मम्मामॅडम : (उमेदवारांच्या याद्या तपासण्यात व्यग्र...) हं!

बेटा : (हात हलवत) हाय देअर...मी आलोय...मी...मी...! लक्ष आहे का?

मम्मामॅडम : (न पाहताच) उगीच जोराजोरात हात हलवू नकोस! कळलंय मला!!

बेटा : (दोन्ही हात हलवत) सवय लागली आहे!! क्या करें? हात हलला नाही तर हालात कसे बदलणार?

मम्मामॅडम : (कोरडेपणाने) नुसते हात हलवून हालात बदलणार नाहीत, वेळीच पावलं उचलली नाहीत, तर पुन्हा हात हलवत परतावं लागेल!!

बेटा : (ठामपणाने) आपल्या पक्षात पाय हलवणाराही मीच एकमेव आहे, मम्मा!! उगीच का मी दोनदा भारत जोडो यात्रा केली!! साडेतीन हजार किलोमीटर चालणाऱ्या माणसाला तुम्ही पावलं उचलायला सांगताय? कमालच झाली!! एका किलोमीटरला सुमारे दीड हजार वेळा पावलं उचलावी लागतात, आता दीड हजार गुणिले साडेतीन हजार...करा गणित!!

मम्मामॅडम : (आव्हानात्मक सुरात) कर बरं तूच!

बेटा : (नाद सोडत) जाऊ दे! मुद्दा एवढाच की मी पावलं उचलली आहेत, आणि आता हात हलता ठेवला आहे! ‘हात बदलेगा हालात’ असं आपल्या पक्षाच्या जाहिरातीत म्हटलंच आहे!!

मम्मामॅडम : देशाची हालत भयंकर आहे! बेरोजगारीनं कळस गाठला आहे! शेतकरी आंदोलनं करत आहेत! लोकशाही बुडत चालली आहे! संविधान वाचवणं गरजेचं आहे...

बेटा : (गंभीर मुद्रेनं) गेली दहाएक वर्ष मी तेच करतोय! माझ्या यात्रेला किती प्रतिसाद मिळाला ते बघितलं ना?

मम्मामॅडम : यात्रेमुळे फार मतं मिळतील, असं वाटत नाही, असा गोपनीय अहवाल खर्गेजींनी नुकताच मला दाखवला!

बेटा : (स्फूर्ती येऊन) डोण्ट वरी, मम्मा! मारो गोली अहवाल कू!! देशभर हिंडून मी भारत जोडून टाकला आहे! यावेळी तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल! दोन महिन्यांनंतर मोदीजींचं राज्य लयाला गेलेलं दिसेल! मोदीजी गेले की मी देश बदलायला घेईन!! आपल्या पक्षाचा जाहीरनामा एकदा नजरेखालून घाल! कळेल तुला!!

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) जाहीरनामा वाचून कोणी मतदान करत नाही रे!!

बेटा : (जिद्द न सोडता) माझ्या गाडीच्या टपावरुन केलेल्या रोड शोमुळे हवा निर्माण झाली आहे! त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत पडलेलं दिसेल!

मम्मामॅडम : (डोकं चोळत) रोडशोवर काही ठरत नसतं रे! त्या कमळवाल्यांचे रोडशो बघ, किती भव्य असतात!!

बेटा : (हेका न सोडता) माझ्या भाषणांना किती गर्दी होतेय, बघा की जरा!

मम्मामॅडम : (गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यानं) तुझ्या भाषणांबद्दल तर काही बोलूच नकोस!

बेटा : (निर्धाराने) देश की जनता बदल रही है! देश बदल रहा है!! मैं खुद उसे बदलूंगा! अपना यह हाथ बदलेगा हालाथ!!

मम्मामॅडम : (दुरुस्ती करत) हाथ बदलेगा हालात...हालाथ नाही!!

बेटा : (निर्विकारपणे) आमच्या वायनाडमध्ये ‘हालात’चा उच्चार ‘हालाथ’ असाच करतात!!

मम्मामॅडम : (बाम कपाळाला लावत) कधी एकदा ही निवडणूक आटोपतेय असं झालंय! नुसती डोकेदुखी आहे, झालं!

बेटा : (समजूत घालत) हालात बदलत असताना डोकं दुखतंच!!

मम्मामॅडम : (चिंताग्रस्त सुरात) ‘हाथ बदलेगा हालात’ हे ठीक आहे, पण देशाची हालत सुधारण्यापूर्वी आपल्या हाताची हालत कोण सुधारणार? आपल्या हातात आहे तेवढं करायचं!!

बेटा : (विजयी मुद्रेनं) ‘हात की बात’ किंवा ‘हात की सफाई’ हे घोषवाक्य कसं आहे? ग्रेट ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com