ढिंग टांग : एक फाटका माणूस..! (गाजणाऱ्या आगामी चरित्रातून..)

लोकशाहीत फाटक्या माणसाला फार्फार महत्त्व आहे. किंबहुना फाटका माणूस नसेल तर लोकशाही टिकणारच नाही.
dhing tang
dhing tangsakal

लोकशाहीत फाटक्या माणसाला फार्फार महत्त्व आहे. किंबहुना फाटका माणूस नसेल तर लोकशाही टिकणारच नाही. लोकशाही म्हणजे फाटक्या माणसांनी फाटक्या माणसांसाठी चालवलेले फाटके राज्य. आमचा कथानायक असाच एक फाटका माणूस आहे. कुठूनही बघा! माणूस फाटलेलाच.

अशाच एका फाटक्या माणसाची ही गोष्ट. फाटक्या माणसाचे नावच मुळी फाटका माणूस असे होते. सडाफटिंग. ना आगा ना पीछा. इतका फाटका की चहावालाही त्याला कधी कटिंगचे पैसे मागत नसे. उलट चहावाला त्याचे लाड करी. त्याला आपणहून फुल्ल कप चहा देत असे. वर डब्बल चम्मच शक्करही देण्याची तयारी दाखवी. चहावालाही एकेकाळी फाटका माणूसच होता. झोळी घेऊन आला, आणि आता सारे गाव त्याच्याच हातचा चहा पीत असते. असो.

फाटका माणूस जिथेतिथे फाटलेला होता. अगदी चिंध्याच चिंध्या. कुठे घर नाही की घाट नाही. (‘ना घर का न घाटका’ या हिंदी मुहावऱ्याचा स्वैर अनुवाद.) विनाअनुदानित इंटरनॅशनल शाळा नाही, की साधे मेडिकल कॉलेजही नाही. एखादा असता तर त्याने विद्यापीठ उभारले असते. पण कशात काय नि फाटक्यात पाय! फाटक्या माणसाने अशा भानगडी कध्दी कध्दी केल्या नाहीत.

फाटका माणूस एकटाच होता. संसाराचा लबेदा नाही. तो रेल्वे स्टेशनावरही सहज झोपी जाई. काही लग्न झालेले लोकही तिथे कधी कधी खांदे पाडून येत. निमूटपणे झोप काढून पाय ओढीत आपापल्या घरी जातात. पण फाटका माणूस फलाटावरच्याच नळावर तोंड विसळे. गर्दी कमी असेल तर तिथेच आंघोळही उरके!! फलाटावरच वडाउसळ खाऊन कामाला लागे. फाटका माणूस कितीही फाटका असला तरी जनसेवेचे व्रत सोडत नाही.

बघावे तेव्हा जनसेवेत गुंतलेला असतो. सतत जनसेवेत असल्याने तो बारा गाव हिंडलेला आहे. त्याला कोणीही उपरा समजत नाही. फाटक्याला उपरा कसे म्हणणार? फाटक्या माणसाला सतरा भाषा येतात. इंग्रजीसुध्दा असे फाडफाड बोलतो की भले भले ‘ओह गॉड’ असे म्हणतात. तीन महिन्यांचे अर्भक असतानाही फाटका माणूस इंग्रजी बोलू शकत होता कारण त्याचा रॅपिड इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आदल्या जन्मीच झाला होता. असो.

फाटका माणूस कितीही फाटका असला तरी जनसंपर्कात मात्र भर्जरी होता. सगळ्याच थोर नेत्यांना तो आपलासा वाटे. थोर नेते त्याला प्रेमाने फाटका म्हणायचे. तो स्वत:ला अभिमानाने फाटका म्हणवून घ्यायचा. अशा फाटक्या माणसाला एक दिवस एका थोर नेत्याने साद घातली. फाटकाच इसम तो! कुणीही साद घालावी, आणि याने जावे! थोर नेत्याने त्याच्या हातात

तिकिट ठेवले. म्हणाले, ‘घे, कर मजा!’ पण तेवढ्या फाटक्या माणसाच्या खिशातला तुटका मोबाइल फोन वाजला. फोनवर सर्वात थोर नेते होते. ते म्हणाले, ‘वहां क्यां कर रहें होंऽ…अठरहवीं लोंकसभां और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहें हैं…’

फाटका माणूस खुश झाला. आपल्यामध्ये जे जे गुण आहेत, ते सगळेच्या सगळे लोकसभेत जाण्यासाठीच युक्त आहेत, याचा दृष्टांत जणू त्याला झाला. सतरा भाषा, सडाफटिंग, झोपडी, गुहा, रेल्वे फलाट या ठिकाणी मस्त झोपण्याची सवय…आणखी काय हवं? थोर नेत्याला झासा देऊन फाटक्या माणसाने थेट सर्वात थोर नेत्याचे ऐकले.

अखेरीस त्याने थोर नेत्याला ‘आलोच’ असे सांगून सर्वात थोर नेत्याच्या आदेशानुसार कूच केले, आणि विजयी, पण फाटक्या मुद्रेने तो ओरडला : ‘जगात जर्मनी, भार्तात पर्भणी’!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com