ढिंग टांग : निगेटिव्ह सर्व्हे : एक पाहाणी!

सर्व्हेशिवाय कुठलीही निवडणूक पार पडू शकत नाही. निवडणुकीपूर्वी सर्व्हे होतात. निवडणूक हाच एक सर्व्हे असतो, आणि निवडणुकीनंतरही सर्व्हे करावे लागतात.
dhing tang
dhing tangsakal

सांप्रत सर्व्हेचे दिवस आहेत. सर्व्हेशिवाय कुठलीही निवडणूक पार पडू शकत नाही. निवडणुकीपूर्वी सर्व्हे होतात. निवडणूक हाच एक सर्व्हे असतो, आणि निवडणुकीनंतरही सर्व्हे करावे लागतात. सर्व्हेमुळे लोकशाही बळकट होते. सर्व्हेमुळे जनतेचे नेमके म्हणणे काय आहे, हे जनतेला कळण्याआधीच कळू शकते. सर्व्हे नसते, तर सर्व जीवमात्र दु:खी झाले असते.

थोडीशी पार्श्वभूमी : ‘सर्व्हेपि सुखिन: संतु, सर्व्हे संतु निरामय:’ असे संस्कृत वचनच आहे. त्या अर्थी वेदकाळातही सर्व्हे होत असावेत असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. महाभारत काळात वारंवार सर्व्हे होत असत, असे दाखले आहेत. युद्ध करावे की न करावे, हे ठरवण्यासाठी सर्व्हे घेण्यात आला होता, त्यात हस्तिनापुरातील सुमारे सव्वा अक्षौहिणी नागरिकांचे सँपल निवडण्यात आले होते. त्यात युद्ध करावे, असा जनमताचा कौल ठरला, असे सांगितले जाते.

इतकेच नव्हे तर युद्ध चालू असतानाही सर्व्हे होत असत. भारतीय युद्धात अश्वत्थामा नावाचा कुंजर (पक्षी : हत्ती, एलिफंट) मृत्युमुखी पडला असता, सर्व्हे घेण्यात आला. त्यात चाळीस टक्के सैनिकांनी द्रोणपुत्र अश्वत्थामास वीरमरण आल्याचे छातीठोकपणे सांगितले, तर चाळीस टक्के लोकांनी ‘छे, हत्ती मेला’ असे सांगितले. वीस टक्क्यांनी ‘सांगता येत नाही’ असे उत्तर दिले. परिणामी युधिष्ठिराने ‘नरो वा कुंजरोवा’ असा कौल जाहीर केला. असे बरेच दाखले देता येतील.

सर्व्हेचे विविध प्रकार : निवडणूकपूर्व ओपिनियन पोल, प्रत्यक्ष निवडणूक, आणि मग एग्झिट पोल अशी साधारण रचना असते. या रचनेपलिकडे हल्ली राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवण्यासाठीही सर्व्हे घेतात. हे सर्व्हे दोन प्रकारचे असतात. एक, निगेटिव सर्व्हे आणि दुसरा, पॉझिटिव सर्व्हे. हे सर्व्हे कोण व कुठे घेते, हे कुणालाही ठाऊक नसते. पण त्यांचा थेट कौल मिळतो, हे मात्र खरे. पॉझिटिव सर्व्हेचा निकाल जाहीर होत नाही. थेट तिकिटच हातात पडते. पण निगेटिव्ह सर्व्हे हे एक गूढ प्रकरण आहे. त्याचा परामर्श घेणे सयुक्तिक राहील.

निगेटिव सर्व्हेची महती : राजकीय पक्षांच्या हातात हे एक नवे अस्त्र आले असून, भल्या भल्यांची छुट्टी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. काही नामचीन उमेदवार तिकिटासाठी अडून बसतात. त्यांना तिकिट द्यायचे नसेल, तर ‘तुमचा निगेटिव सर्व्हे आहे, सबब तिकिट मिळणार नाही’ असे सांगण्याची सुविधा यामुळे प्राप्त होते. एखाद्या उमेदवाराचा सर्व्हे निगेटिव आला की त्याला संतापून दुसऱ्या पक्षातही सामील होणे अशक्य होऊन बसते.

निगेटिव सर्व्हे असलेल्याला दुसऱ्या पक्षात तरी तिकिट कसे मिळणार? चडफडत बसण्यापलिकडे काहीही करता येत नाही. उमेदवाराला तिकिटासाठी वरिष्ठ नेत्यांना ‘इमोशनल ब्लॅकमेल’ही करणे कठीण होऊन बसते. शिवाय मनात भीती बसते ती वेगळीच! आत्मविश्वास लयाला जातो. नववीतच किंवा प्रीलिममध्ये गचकलेल्या विद्यार्थ्याला दहावीची स्वप्ने बघणे कठीण व्हावे, त्यातलाच हा प्रकार आहे.

निगेटिव सर्व्हे आल्यास काय करावे? : काहीही करु नये! मुळात उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घ्यायला जाऊच नये. पक्षश्रेष्ठींशी कायमस्वरुपी संधान ठेवावे, आणि गेलाबाजार एखादी विधानपरिषद किंवा महामंडळ मिळवून समाधानी राहावे. अगदीच काही नाहीच जमले तर पक्षाचा आदेश असल्याचे सांगून पक्षबांधणीसाठी परराज्यात वर्णी लावून घ्यावी. दृष्टीआड सृष्टी!

सत्य : निगेटिव सर्व्हे नावाचा सर्व्हे काल्पनिक असतो. तो कोणीही कधीही करीत नाही. तिकिट कापण्यासाठीचे ते तोंडावर फेकण्याचे एक कारण आहे, हे सत्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com