ढिंग टांग: निरोप आणि निरोप्या!

ढिंग टांग: निरोप आणि निरोप्या!

(स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.

वेळ : उत्कंठेची. काळ : हुरहुरीचा.)

उधोजीराजे : (अंत:पुरात येरझारा घालत) कोण आहे रे तिकडे? केव्हापासून आम्ही बोलावतंय, कुणी धावत येईल तर शपथ! कुठे कडमडले लेकाचे?

संजयाजी फर्जंद : (घाईघाईने येऊन मुजरा करत) महाराजांचा विजय असो! आपण याद केलीत?

उधोजीराजे : (कपाळाला आठ्या घालत) आमचा नेहमीचा फर्जंद कुठं आहे? तुम्ही कां आलात?

संजयाजी : (सारवासारव करत) नेहमीचा फर्जंट अर्जंट कामासाठी अर्जंट बाहेर गेला आहे महाराज! मी अर्जंट कामासाठी अर्जंट आत आलो आहे!! बोला!!

उधोजीराजे : तुमची कामं अर्जंटच असतात वाटतं!

संजयाजी : (आज्ञाधारक सुरात) महाराष्ट्राच्या दौलतीसाठी हा सेवक सदैव तयार असतो महाराज!

उधोजीराजे : (नेहमीच्या शैलीत) आमच्या राज्याचा हालहवाल काय आहे?

ढिंग टांग: निरोप आणि निरोप्या!
कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची पदवीपर्यंतची फी माफ

संजयाजी : (निश्‍चिंतपणे) सगळं काही आलबेल आहे महाराज! चोर चोऱ्या करत आहेत! दरोडेखोर दरोडे टाकत आहेत! खंडणीखोर खंडण्या गोळा करत आहेत, आणि समस्त प्रजाजन मेटाकुटीला आले आहेत!

उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) अस्सं? मग आमच्या दौलतीच्या मुख्य कोतवालांना ताबडतोब हजर करा! म्हणावं, ही राजाज्ञा आहे! जेवत असाल तर तिथल्या तिथे हात धुऊन येथे हजर व्हा... (गडबडून) म्हंजे हात वारंवार धुतलेच पाहिजेत! किंबहुना धुवाच! जेवणापूर्वीही धुवा म्हणावं...आणि हो, मास्कसुद्धा वापरा म्हणावं!...

संजयाजी : (नकारार्थी मान हलवत) ऊंहू!! दौलतीचे मुख्य कोतवाल सध्या ईडीच्या चौकशीत बिझी आहेत, महाराज! ते येऊ शकणार नाहीत! आपल्या दौलतीचा कारभार इतका बेस्ट चालला आहे की खुद्द कोतवालच चौकशीच्या फेऱ्यात अडकला जी!!

उधोजीराजे : (गोरेमोरे होत) बरं बरं! आमचं दैनंदिन टपाल अजून कसं आलं नाही? टपाल नाही पाहिलं तर आम्ही कागदपत्रं कशी हातावेगळी करणार? कागदपत्र हातावेगळी केली नाहीत, तर कारभार कसा करणार?

संजयाजी : दैनंदिन टपाल मीच बघतो महाराज!

उधोजीराजे : (क्रुद्ध चेहऱ्यानं) हो? आणि मग आम्ही काय वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवतो?

संजयाजी : तसं नव्हं, महाराज! पोलिटिकल पोष्टखातं माझ्याच अखत्यारीत येतं, येवढंच सांगायचं होतं!

उधोजीराजे : (करारी मुद्रेने) बरं, बरं! आम्हाला तांतडीने गोपनीय खलिता रवाना करायचा आहे! अत्यंत विश्वासू सांडणीस्वाराला तात्काळ नामजाद करा!

संजयाजी : (आणखी मान लववून) मीच तो विश्वासू सांडणीस्वार नाही का महाराज?

उधोजीराजे : (छद्मीपणाने) खलिता गोपनीय आहे फर्जंदा, पेपरात छापून आणायचा नाहीए!!

ढिंग टांग: निरोप आणि निरोप्या!
हल्ल्यांसाठी वाढतोय ड्रोनचा वापर; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चिंता व्यक्त

संजयाजी : (आत्मविश्वासाने) आपण कॉन्फिडेन्शल आणि पब्लिक दोन्ही पत्रव्यवहार हॅंडल करतो, महाराज! टेन्शन घेऊ नये! काळजी नसावी!!

उधोजीराजे : (आश्‍चर्यानं) अस्सं? बरेच दिसता की तुम्ही फर्जंदराव!!

संजयाजी : आपलाच जुना सेवक आहे मी, महाराज!

उधोजीराजे : (कुजबुजत्या पट्टीत) कान इकडे करा! आम्हाला पेडर रोडच्या एका पत्त्यावर खलिता पाठवायचा आहे, अर्जंट!

संजयाजी : (तत्परतेनं) ‘सिल्वर ओक’च्या आड्रेसवर ना? नो प्रॉब्लेम! माझी बरीचशी ड्यूटी तिकडेच लागलेली असते! आपलं तिकडे नेहमीचं जाणंयेणं आहे! घरचाच आहे म्हणा ना मी! तिकडून तुमच्यासाठी एक गोपनीय खलिता मी आलरेडी आणलाच आहे! हा घ्या!

उधोजीराजे : (हतबुद्ध होत) तुम्ही त्यांचे फर्जंद आहात की आमचे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com