ढिंग टांग : चित्त जेथा भोयोशून्य…!

कल्याणीयेषु, ओरोबिंदोबाबू यांना प्रोनाम. चिठी लिहिण्यास कारण की तुम्हाला इडीचे निमोंत्रोण आल्याची खोबोर लागली, आणि इथे कोलकात्यात माझे झोप उडाली.
Dhing Tang
Dhing Tangsakal

कल्याणीयेषु, ओरोबिंदोबाबू यांना प्रोनाम. चिठी लिहिण्यास कारण की तुम्हाला इडीचे निमोंत्रोण आल्याची खोबोर लागली, आणि इथे कोलकात्यात माझे झोप उडाली. हे सगळे गेम कोणाचे आहेत, याची तुम्हाला कोल्पोना असेलच! आपण दोघेही ‘इंडिया’चे मेंभार आहोत. इंडिया आघाडीला घमंडिया आघाडी असे हिणवले जाते, ते प्रामुख्याने तुमच्या-माझ्यामुळेच.

काँग्रेसवाल्यांचा घमंड मी आणि तुम्हीच तोडला आहे, त्यामुळे आपणच आता घमंडिया उरलो. तथापि, इडीच्या कार्यालयात जाताना तुम्ही थोडी खोबोरदारी घ्यावी, असे वाटले. म्हणून ही चिठी कोड लँग्वेज (पक्षी : माराठी) मध्ये लिहीत आहे. माझ्या मंत्र्यांनाही इडीने खूप छोळोले! भोयोंकोर अनुभव!! जाऊ दे.

चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर,

ज्ञान जेथा मुक्त, जेथा गृहेर प्राचीर

…पूज्य रोबिंद्रनाथ ठाकूर यांची ही गाजलेली कोबिता तुम्हाला ठाऊक आहे का? ती मिळवून पाठ करा. आपल्या इंडिया आघाडीसाठी ती अगदी उपयुक्त कोबिता आहे. अर्थासह पूर्ण कोबिता नंतर पाठवेन. परवा दोन तारखेला तुम्हाला इडीच्या कार्यालयात बोलावतील. तेव्हा एकटेच जा! आणि ओठांवर या कोबितेच्या ओळी असू देत. तुम निर्भय बनो!

इडीच्या दरवाजावर कोणीही नसते. कोण पाहिजे? असे तिथे कोणीही कुणालाही विचारत नाही. तिथे जाणारा मानुष एकतर संशयित म्हणून जातो किंवा तपास अधिकारी म्हणून! आपण तपास अधिकाऱ्याच्या भेषात (पक्षी : वेशात) जायचे.

तिथे बराच वेळ कोणीही विचारायला येत नाही. थोड्या वेळाने एक जण येतो आणि विचारतो, ‘‘काय केस आहे?’’ तुम्ही सांगा, ‘‘एक्साइज!’’ तो निघून जाईल. थोड्या वेळाने आणखी एक जण येईल आणि नाव विचारुन जाईल. मग बऱ्याच वेळाने तिसरा येईल…असे संध्याकाळपर्यंत चालेल. मग कार्यालयाच्या बाहेर येऊन दोन बोटे दाखवून विजयाची खूण करुन टीव्ही कॅमेऱ्यांना पोज दिली की विषय संपला!

इलेक्शनच्या वेळेला तुम्ही कोलकात्यात प्रचाराला या, मी दिल्लीला येईन! आपण दोघांनी जोर लावला तर कमळवाल्यांच्या मागे इडी लावण्याची संधी इंडिया आघाडीला मिळेल, अन्यथा नाही. मोदीजी बंगालला (पक्षी : मला) भीषोण घाबरतात! आधी मी त्यांना रोशोगुल्ले पाठवायचे, आता तेच मला ढोकळा पाठवतात! कारण इंडिया आघाडीत माझेच नाव आघाडीवर असून भविष्यात मीच पंतप्रधान होईन, अशी त्यांना भीती वाटते.

कळावे. आपली कृपाभिलाषी. मोमोतादिदी. (कोलकाता)

प्रिय बेहेन ममतादिदी, सादर प्रणाम. तुमचे पत्र मिळाले. मी एक साधासुधा आम आदमी आहे. आम्हाला कुठली कविताबिविता? रवींद्रनाथ टागोर हे नाव मात्र ऐकून आहे! गरीब सामान्य माणसाला कविता वगैरे येत नसते. तुम्ही माझे ‘मैं हूं अन्ना, तू है अन्ना, हम सब है अन्ना’ हे समूहगीत ऐकले होते का? त्यात बदल करुन ‘मैं हूं केजरीवाल’ हे नवे गाणे आता केले आहे. तेच म्हणत मी इडीच्या कचेरीत जाणार आहे.

आम आदमीला (पक्षी : मला) मोदीजी जाम घाबरतात. कुठल्याही परिस्थितीत आम आदमी नष्ट झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणूनच इडीचा ससेमिरा त्यांनी माझ्या मागे लावला आहे. आम आदमी मोठा झाला तर इंडिया आघाडी जिंकेल आणि पुढेमागे हाच आम आदमी पंतप्रधान होईल, असे त्यांना वाटते. एखादा माणूस असतो घाबरट! चालायचेच.

कळावे. आपला नम्र. एक आम आदमी. (दिल्ली आणि पंजाब)

ता. क. : सिंगुरच्या केसमध्ये तुम्हाला साडेसातशे कोटीचे पांचफोडण बसले असे कळले. खरे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com