ढिंग टांग : तेरे मेरे बीच में...!

भारताच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागरात चिमुकली भारतीय बेटे आहेत. त्या बेटांना लक्षद्वीप असे म्हणतात. मल्याळम किंवा संस्कृत भाषेत लक्ष म्हणजे लाख!
Dhing Tang
Dhing Tangsakal

भारताच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागरात चिमुकली भारतीय बेटे आहेत. त्या बेटांना लक्षद्वीप असे म्हणतात. मल्याळम किंवा संस्कृत भाषेत लक्ष म्हणजे लाख! (मराठीतील लक्षाकडे कृपया दुर्लक्ष करावे.) लाख द्वीपांचा, म्हंजे बेटांचा हा समूह लक्षद्वीप या नावाने ओळखला जातो. पूर्वी इथेही ब्रिटिश राजवट होती. पण ब्रिटिश साहेबाला काही केल्या लक्षद्वीप हे नाव उच्चारता न आल्याने त्याची पंचाईत झाली. ‘लॅकडिव’ असे काहीतरी तोंड वेंगाडत ती गोरी माकडे बोलत असत. परिणामी हे बेट भारतीय प्रजासत्ताकात समाविष्ट झाले.

वास्तविक लक्षद्वीप हे फक्त नावापुरते. लाख बेटे वगैरे तिथे काही नाहीत. प्रत्यक्षात तिकडे बारकी बारकी शंभरेक बेटे आहेत. त्यातली छत्तीसच त्यातल्यात्यात बरी आहेत, त्यातलीही दहाच बेटे मानवी वस्त्या बाळगून आहेत. अशा या लक्षद्वीप बेटांवर निसर्गाची मात्र मुक्तहस्ते उधळण झाली आहे. ‘कभी तो पधारो हमारे लक्षद्वीप में’ अशी जाहिरात बघितल्याचे आठवत नव्हते. तेव्हा यंदा (सुट्टीत) कुठे जावे? असा विचार सुरु झाला, तेव्हा मालदीवची आठवण आली.

मालदीव म्हटले की मनाच्या नारळात खोबऱ्यासारखी मलईदार प्रेमभावना जागृत होते. (नारळपाण्याची उपमा द्यायची होती, पण मध्येच खोबरे झाले.) मालदीव येथे अनेक सधन नवपरिणीत जोडपी मधुचंद्रासाठी जातात. तशी मुळी चालच आहे. मालदीवला जावे, लाखो रुपये देऊन तेथील झोपडीत राहावे, छॉन छॉन सेल्फ्या घेऊन ‘इन्स्टा’वर टाकाव्यात. लाल लाल बदाम, पिवळ्या पिवळ्या चांदण्यांची पखरण करुन ‘फीलिंग ऑसम...’ असे जाहीर करुन टाकावे! वर्षभरानंतर दुपटी बदलताना हे आठवले की, मालदीव सत्कारणी लागल्याची भावना होते.

...मी सडाफटिंग मुसाफिर! झोला उठाया, चल पडा!! पण मालदीवला एकट्याने जाणे बरे दिसणार नाही, म्हणून मग शेवटी लक्षद्वीपला जायचे ठरले. समुद्र किनाऱ्यावर बसण्यासाठी खुर्ची, कागदी पॅड, लेखणी, जाकिट, उपरणे तथा मफलर आणि फोटोग्राफर अशी जीवनावश्यक सामग्री तेवढी घेऊन लक्षद्वीपला गेलो. प्रवास नेहमी सुटसुटीत, कमी सामानानिशी करावा, या मताचा मी आहे. असो.

लक्षद्वीपचे वर्णन काय करु? शब्दच कमी पडतात. निळेशार आभाळ. निळेशार पाणी. निळ्याची निळाई इतकी की काही काळाने मला सगळेच निळे निळे दिसू लागले. मग मी गॉगल चढवला. गॉगलमुळे निळा रंग आणखी गडद निळा झाला. मला वाटले, माझे डोळेच निळे झाले. पण तेव्हा मालदीवमधल्या (देशातल्याही) काही लोकांचे डोळे पांढरे झाले असतील, याची मला कल्पनादेखील नव्हती.

लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर मी खुर्ची टाकून उगाच बसलो. आभाळात नजरा लावून पोजेस दिल्या. कागदाचे पॅड ओढून समुद्र काढला. आभाळात ढग काढले. मराठी ‘चार’चे असंख्य आकडे काढून आभाळभर बगळे काढले. एक नारळाचे (वाकडे) झाड काढून बघितले.

पण ते विचित्रच दिसू लागल्याने कागद फाडून टाकला, आणि थोडा किनाऱ्यावर चाललो. लक्षद्वीपच्या दोन स्थानिकांनी मला ओढत समुद्रात नेले. लाइफ जाकिट घातले की माणूस सेफ असतो, हे कळले. मी आता वेगळ्या स्टाइलचे लाइफ जाकिटही लोकप्रिय करण्याचे ठरवले आहे. प्रथेप्रमाणे मी एक ‘ट्विट’ करुन टाकले...

मालदीवला निघालेल्या मुसाफिरांनो, ‘तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना? तूने नही जाना, मैंने नही जानाऽऽ...!’ इकडेतिकडे न बघता सरळ आपल्या लक्षद्वीपला चला! तिथे ते सारे आहे, जे मालदीवला मिळते!! इथून मी सारी साधनसामग्री घेऊन मालवणला निघालो आहे. येवा, कोकणही आपलाच आसा!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com