ढिंग टांग : सचिन ठिपकेची जबानी...!

तपास अधिकारी दिगंबर वाघ आणि अन्य वनअधिकारी खुर्च्यांवर सावधपणे बसले आहेत. आणि...समोरील खुर्चीत कात्रजमध्ये दहशत माजवणारा कुख्यात समाजकंटक सचिन ठिपके!!
Dhing tang
Dhing tangsakal

स्थळ : कात्रज वन्यप्राणी उद्यान, पुणे.

तपास अधिकारी दिगंबर वाघ आणि अन्य वनअधिकारी खुर्च्यांवर सावधपणे बसले आहेत. आणि...समोरील खुर्चीत कात्रजमध्ये दहशत माजवणारा कुख्यात समाजकंटक सचिन ठिपके!! त्याला नुकतेच पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे. जबानीतले सवालजबाब :

दिगंबर वाघ : (घसा खाकरत) नाव सांगा!

सचिन ठिपके : (कंटाळल्यागत) गुर्रर्र...गुर्रर्र...!

दि. वाघ : (करडेपणाने) घोरु नका, नाव सांगा!

स. ठिपके : (डोळे मिटून) नावच सांगितलं!

दि. वाघ : (कागदपत्रांवर नजर टाकत) इथं तुमचं नाव सचिन ठिपके असं दिलंय!!

स. ठिपके : (जांभई देत) थँक्यू!

दि. वाघ : (कागदांवरली माहिती वाचून) सचिन ठिपके, उमर आठ वर्षे तीन महिने, कदकाठी तीन फूट बाय पाच फूट, जन्म : हंपी, सध्या राहणार कात्रज...बरोबर आहे ना?

स. ठिपके : (संबंध नसल्यागत) पुढं बोला!!

दि. वाघ : (डोळे बारीक करत कठोरपणे) तारीख ४ माहे मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पिंजऱ्याचे गज वाकवून तुम्ही पळालात! गुन्हा कबूल?

स. ठिपके : (वैतागून) खायला मागवा हो काहीतरी!! (भडकून) मिसळी नि साबुदाणा वडे खातात लेकाचे!! हॅ:!!

दि. वाघ : (करारीपणाने) तोंड सांभाळून बोला! कोणाबद्दल बोलताय तुम्ही?

स. ठिपके : (हेटाळणीच्या सुरात) तुमचेच हे...हे...पुणेकर! बघावं तेव्हा हाटेलात बसलेले नाहीतर टू व्हीलरवर! हॅ:!!

दि. वाघ : (मुद्द्यावर येत) सर्व सुरक्षाव्यवस्थांचा कात्रज करुन तुम्ही पळ कसा काढला? बोला!!

स. ठिपके : (सात्विक संतापाने) मोदीबागेत गेलो होतो! महात्मा सोसायटीत ‘देवाशिष’ बंगल्यावरही गेलो होतो! मनसेच्या तात्या मोरेंकडेही जाऊन आलो! एकही नेता घरात भेटला नाही!!

दि. वाघ : (घबराटीनं) तुम्ही मोकाट सुटल्याच्या बातम्या आल्यावर कोण पुण्यात थांबेल?

स. ठिपके : (मोठ्यांदा शिंकत) आकछी!! केवढी ती धूळ! कसली ती मेट्रोची कामं!! जीव विटला अगदी! एवढा विकास करुन पुणेकर करणार काय? मिसळी खाणार!!

दि. वाघ : (गुळमुळीतपणाने) पुणेकर दिवसभर पुणेरी मिसळच खात असतात, का?

स. ठिपके : (बिनतोड युक्तिवाद करत) मग जगातले तमाम बिबटे मानवी वस्त्यांमध्ये शिरुन कोंबडीकुत्री उचलण्यातच व्यग्र असतात, असं तुम्ही तरी का समजता? आम्हालाही कधी कधी वाटतं की, डेक्कनवर चक्कर टाकावी, चितळ्यांकडे जाऊन एखादी बाकरवडी तोंडात टाकावी!! मंडईत जाऊन उगाचच मटाराचा भाव विचारुन दोडके आणावेत!!

दि. वाघ : (अंतर्मुख होत) पुणेकरांची दु:खं तुम्हाला काय समजणार ठिपके?

स. ठिपके : (हताशेनं मान हलवत) काय तो ट्रॅफिक!! अहाहाहाहा...टू व्हीलरवाले तर स्वत:ला बिबटे किंवा चित्तेच समजतात! भारी चपळ जात!! कुठून कशी मुसंडी मारेल, सांगता येत नाही! तुमचं पुणं म्हणजे माणसांचं अभयारण्य आहे, अभयारण्य!!

दि. वाघ : (संभ्रमात) हे कौतुक आहे की टोमणा?

स. ठिपके : (गुरगुरत) ...विद्यापीठाच्या चौकात सकाळी उभा होतो, सिग्नल ओलांडायला दुपार टळली! बाय द वे हु इज धंगेकर?

दि. वाघ : (प्राणांतिक दचकून) तोंड सांभाळून बोला, मि. ठिपके!

स. ठिपके : (बेलाशक दुर्लक्ष करत) केवढी होर्डिंगं लावता हो तुम्ही! हॅ:!!

दि. वाघ : (खमकेपणाने) तुम्ही गज वाकवून पळालात कसे, हे सांगा!

स. ठिपके : (कातर आवाजात) अहो, या कात्रज उद्यानात बिबट्यांच्या कक्षात तीन माद्या आणि एकटा नर -मी!! राहून बघा तुम्ही...मग कळेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com