माणसाने आयुष्यात काहीही व्हावे; पण क्यांटिन कर्मचारी होऊ नये. हाटेलमध्ये वेटर व्हायला काही हरकत नाही. तिथे टिप तरी भेटते. क्यांटिनमध्ये फक्त कुपने! त्यातून माझ्यासारखा कमनशिबी क्यांटिन कर्मचारी असला तर आयुष्याची पनीर भुर्जी झाली म्हणून समजा!
मी एक साधासुधा क्यांटिन कर्मचारी आहे. सटवाईने माझ्या कपाळी काही लिहिले की गरम झाऱ्याचा चटका दिला, नकळे!! आयुष्यभर मी क्यांटिनमध्येच चाकरी करत राहिलो. काही वर्षांपूर्वी दिल्लीत महाराष्ट्र सदनात वातड चपाती वाढल्याबद्दल महाराष्ट्रातील विचारेसाहेब नामक खासदाराने एका वेटरच्या तोंडात ती चपाती कोंबली होती, हा किस्सा तुम्ही विसरला असाल, पण मी विसरलो नाही. कारण ते तोंड माझेच होते. त्या आठवड्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये मी अशा चौतीस चपात्या खाल्ल्या, हे मी दु:खद अंत:करणाने नमूद करत आहे…