#InnovativeMinds संधीच्या अवकाशात घ्या उंच भरारी...! 

#InnovativeMinds संधीच्या अवकाशात घ्या उंच भरारी...! 

नवीन तंत्रज्ञान व डिजिटल युगात प्रत्येक संधी आपण हेरली पाहिजे. उद्योजकाने किंवा उद्योगाने आपल्या आजूबाजूला बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच उंच भरारी घेण्याची तयारी सुरू केली पाहिजे. सध्याच्या डिजिटल जगात कोणतीही गोष्ट चिरकाल टिकणारी नसल्याने आज आहे तशीच पुढील काळात चालू राहील, याची शाश्‍वती नक्कीच नाही. उद्योगाची भरभराट झाली आणि यशस्वी उद्योगाचे गणित फिट बसले, तरी ते पुढील काळातही बरोबरच असेल, असे सांगता येत नाही. उद्योगाची गणिते नवीन जमान्यात पूर्णपणे बदलली आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी एक ‘स्ट्रक्‍चर’ असावे लागते काही गोष्टी टप्प्याटप्प्याने, नियोजित पद्धतीने कराव्या लागतात. 

आज वेगाने बदल घडत असताना उद्योजकाने सतत डोळे उघडे ठेवून तंत्रज्ञान, बाजार, ग्राहक आणि स्पर्धक यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या सतत बदलणाऱ्या वातावरणात सर्वांत लक्षणीय ठरते ती एखादी त्रासदायक नवकल्पना (इनोव्हेशन). नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आपली सेवा आणखी स्पर्धात्मक करणेच गरजेचे आहे, पण नवकल्पना म्हणजे इतरांपेक्षा काही तरी वेगळे करणे नाही किंवा एखादी गोष्ट सुरू करून ती तशीच पुढे चालू ठेवणे म्हणजेदेखील आधुनिक जगातील उद्योजकता नव्हे. सतत बदल करणे काळाची गरज असून, ते बदल प्रत्यक्षात घडवणे व राबवणे हे त्या उद्योगाला जीवनावश्‍यक असते.

भारतात व्यवसाय सुरू करताना दोन गोष्टींचा विचार मुख्यतः केला जातो. एक, जेव्हा तुम्ही खूप ‘पॅशनेट’ असता किंवा ज्या वेळी तुमच्याकडे काहीच काम नसते. पण हे अतिशय धोकादायक आहे. कारण, एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही ‘पॅशनेट’ आहात, याचा अर्थ तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता असे नाही. व्यवसाय सुरू करताना त्याला एक विशिष्ट धोरण असायला हवे. ‘सिस्टेमॅटिक ॲप्रोच’ असणे अत्यंत आवश्‍यक आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करण्याआधी खूप गोष्टीचा विचार होणे आवश्‍यक आहे. पहिला म्हणजे, कोणतीही गोष्ट टप्प्याटप्प्याने करणे आवश्‍यक आहे, असा विचार केला. आपल्याकडे व्यवसायाकडे ‘सेकंडरी चॉईस’ म्हणून बघितले जाते, पण ते चुकीचे आहे. उद्योगात खूप मोठी ताकद असते. कोणताही उद्योग हा आर्थिक-सामाजिक दृष्ट्या देशाची अर्थव्यवस्था, समाज, तरुण यांवर प्रभाव टाकत असतो आणि त्यात मोठा बदल घडवून आणण्याची त्यात किमया दडलेली असते. 

आम्ही जेव्हा उद्योजक होण्याची स्वप्ने हाती घेतलेल्यांसाठी ‘इडीपी’ हा प्रोग्रॅम विचारात घेतला त्या वेळी, एक व्यावसायिक बनण्यासाठी काय महत्त्वाचे आहे किंवा व्यावसायिकाचे प्रमुख गुण किंवा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे, याचा विचार केला. उदा. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट ही मोठ्या स्केलची ग्रोसरी दुकानेच आहेत. मात्र, फरक आहे तो कंपनीकडे असलेल्या दूरदृष्टीचा, त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलचा. मात्र, सर्वसामान्य माणूस जेव्हा छोटे दुकान चालू करतो त्या वेळी तो कर्ज घेतो. त्याला वाटते की, कर्ज घेऊन भांडवल उभारता येईल. मात्र, ही खूप चुकीची पद्धत आहे. उद्योजकाला सर्वप्रथम आपल्याकडे असलेल्या भांडवलाचे मूल्य (नेट प्रेझेंट व्हॅल्यू) समजले पाहिजे. त्याची आज असणारी आणि भविष्यातील किंमत काय हेही समजले पाहिजे.

बहुतांश नवउद्योजक आपली बचत उद्योग उभारणीसाठी वापरतात. मात्र, बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्वस्त आणि किफायतशीर पर्यायांचा मार्ग शोधून उद्योग सुरू करणे अधिक चांगले. तिसरी गोष्ट म्हणजे, वैयक्तिक आर्थिक स्थिती. आपण बऱ्याच वेळा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीचा विचार करायला विसरतो आणि फक्त एखाद्या गोष्टीबाबत ‘पॅशनेट’ आहे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून आपली जमापुंजी तिकडे गुंतवतो. मात्र, ते पैसे परत ‘रिकव्हर’ करण्यासाठी उद्योगात झटपट पैसे कमावण्याच्या मागे जाऊन उद्योगाचे मजबुतीकरण करण्याकडे दुर्लक्ष करतो. 

आपण सर्वजण फारच आशावादी आहोत. संभाव्य आपत्तीचे नियोजन न करता माझ्याबरोबर वाईट काही होणारच नाही, हा आशावाद बाळगत धोका पत्करतो. मात्र, तुम्हाला सर्व परिस्थितीसाठी तयार असणे गरजेचे आहे. आशावादी असणे चुकीचे नाही, मात्र नियोजन हा सर्वांत मोठा भाग उद्योजकाकडे असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यात काय करायचे नाही हे माहिती असल्यास तुम्ही सर्वकाही जिंकलातच म्हणून समजा. कोणतीही गोष्टी सुरू केल्यानंतर प्रत्येक क्षण तुमचा संयमाचा अंत बघतच असतो...  (क्रमशः)
(शब्दांकन : गौरव मुठे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com