esakal | कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सणबुरात उद्यापासून कर्फ्यू; पाच दिवस बाजारपेठ बंद

बोलून बातमी शोधा

Public Curfew
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सणबुरात उद्यापासून कर्फ्यू; पाच दिवस बाजारपेठ बंद
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : सणबूर (ता. पाटण) येथे अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण नसले, तरीही आजूबाजूच्या गावातून कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येत्या एक ते पाच मे या कालावधीत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत तेथे फक्त वैद्यकीय व बँकिंग सेवाच सुरू राहतील, असे सांगण्यात आले.

ढेबेवाडी खोऱ्यातील मोठ्या लोकसंख्येचे आणि मुंबईशी सर्वाधिक कनेक्शन असलेले सणबूर हे गाव दाटीवाटीच्या लोकवस्तीमुळे गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेले होते. जनता कर्फ्यूसह विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे कोरोनावर मात करणे त्यावेळी ग्रामपंचायतीला शक्य झाले असले तरी पुन्हा अशी वेळ येवू नये यासाठी आता ग्रामपंचायतीने गावात रुग्ण संख्या नसतानाही आजूबाजूच्या गावातून सणबुरात संसर्ग वाढू नये यासाठी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे.

जीवावर उदार होऊन कोविड योद्ध्यांची रुग्णसेवा, सबंध महाराष्ट्राला 'आरोग्य'चाच हेवा!

सणबूरनजीकची बनपुरी, पाटीलवाडी (रुवले) ही गावे कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत. तेथील नागरिकांची विविध कामानिमित्ताने सणबूरच्या बाजारपेठेत ये-जा असते. या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूचा निर्णय घेतल्याचे उपसरपंच संदीप जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, 'गावात ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण ९८ टक्के पूर्ण झाले आहे. लसीकरणाच्या पुढील टप्प्यासाठीही आम्ही योग्य नियोजन केलेले आहे. गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

'मला कोरोना झाला अन् तब्बल चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत राहिले'

आजूबाजूच्या गावातून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आम्ही खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. पाच दिवस वैद्यकीय सेवा वगळता बाजारपेठ पूर्ण बंद राहील.''

-संदीप जाधव, उपसरपंच सणबूर

Edited By : Balkrishna Madhale