

E100 Fuel India
esakal
लेखक : महेश शिंदे
भारताने ऊर्जा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ई-शंभर इंधनासाठी आवश्यक नियामक चौकटीला मंजुरी दिली आहे. ई-शंभर इंधन म्हणजे शंभर टक्के मद्यार्कावर आधारित इंधन असून केंद्र सरकारने नुकतीच त्यासाठी आवश्यक नियमावली आणि तांत्रिक मानके निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे भविष्यात पूर्णपणे ई-शंभर इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी देशात वीस टक्के मद्यार्क मिश्रित पेट्रोलचा वापर सुरू करण्यात आला होता. आता त्यापुढे जात संपूर्णपणे पर्यायी जैवइंधनावर आधारित वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
ई-शंभर इंधन हे शंभर टक्के मद्यार्कावर आधारित इंधन आहे. ऊस, मका, तांदूळ, खराब धान्य, कृषी अवशेष आणि इतर जैविक स्रोतांपासून तयार होणाऱ्या मद्यार्काचा वापर यामध्ये केला जातो. सध्या देशात पेट्रोलमध्ये ठरावीक प्रमाणात मद्यार्क मिसळून वापरले जाते. मात्र, ई-शंभर इंधनामध्ये जवळपास संपूर्ण इंधनच मद्यार्कावर आधारित असते. हे इंधन वापरण्यासाठी विशेष प्रकारच्या वाहनांची आवश्यकता असते. सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये त्याचा वापर शक्य नसतो.