भररस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या भाजप नेत्यास अटक! पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त  

प्रमोद दंडगव्हाळ
Friday, 13 November 2020

सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाच भाजपच्या महिला शहर चिटणीस यांचे पती  यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत भररस्त्यात व भव्य स्वरूपात वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्याचे वातावरण होते. त्यानंतर पोलीसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सिडको (नाशिक) : शासकीय नियम धाब्यावर बसवत भररस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अंबड पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांच्या या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. 

नियम धाब्यावर बसवत भररस्त्यात वाढदिवस
सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाच सिडकोतील राका चौकात भाजपच्या महिला शहर चिटणीस हर्षा फिरोदिया यांचे पती आशिष फिरोदिया यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत भररस्त्यात व भव्य स्वरूपात वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे या वेळी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात विशेषत: शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सरचिटणीस जगन पाटील, नगरसेविका छाया देवांग, विनायक कस्तुरे, मंडळ अध्यक्ष शिवाजी बरके, महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना दिंडोरकर आदींचा समावेश होता.

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

पोलिस ठाण्यात गुन्हा

फिरोदिया यांनी पोलिस विभागाची रीतसर लेखी परवानगी न घेता बॅनर, टेबल-खुर्च्या लावुन व एकत्रित जमून तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव व परिणामांकडे दुर्लक्ष करून स्वत:चे व सामान्य लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती केल्याने अंबड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी तपास करीत आहेत. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

 

कडक कारवाई करण्यात येईल

‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे विनापरवानगी वाढदिवस व अन्य कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांवर यापुढेही गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल. -कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader arrested for celebrating birthday nashik marathi news