बाळासाहेब सानपांनी भाजपचा उंबरा ओलांडताच वादाचे पडघम! आमदारांसह नगरसेवकांमध्ये नाराजी

sanap bjp.jpg
sanap bjp.jpg

नाशिक : माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी वाजतगाजत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून उंबरठा ओलांडला असला तरी त्यांच्या या सोहळ्याला पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी गैरहजेरी लावल्याने भाजपमध्ये वादाचे पडघम पुन्हा एकदा वाजू लागले आहेत. 

भाजपचा उंबरा ओलांडताच वादाचे पडघम 

सानप यांचा प्रवेश सोमवारी निश्‍चित झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी समर्थकांनी मोठी फिल्डिंग लावली. प्रदेश कार्यालयाकडून आमदारांसह सर्वच नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे फर्मान सोडण्यात आले. परंतु महापौरपदाच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणारे काही नगरसेवक वगळता अन्य कोणीही हजेरी लावली नाही. ज्यांनी हजेरी लावली त्यातही अनेक जण विलंबाने पोचले. माजी महापौर रंजना भानसी, माजी उपमहापौर प्रथमेश गिते आवर्जून उपस्थित होते. मनीष मार्केट येथे वाहतूक ठप्प झाल्याची कारणे त्या वेळी देण्यात आली. आमदार ढिकले नाशिकमध्येच होते. पंचवटीतील ज्येष्ठ नगरसेवक उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, दिनकर आढाव, दिनकर पाटील, अरुण पवार यांनीही सोहळ्याकडे पाठ फिरविली. बहुतांश नगरसेवक मराठा असल्याने ही सुप्त नाराजी सांभाळण्याचे मोठे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर राहणार आहे. उपस्थितांमध्येही पक्षाची नाराजी नको म्हणून ही काळजी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

सानपांची राजकीय परीक्षा 
सानप यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला असला तरी त्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. महापौर, उपमहापौर, शहराध्यक्ष व महापालिका निवडणूक यांसारखी मोठी जबाबदारी देऊनही पक्षाचा आदेश न मानता सानप यांनी अन्य पक्षांमध्ये प्रवेश केल्याने ही बाब देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीतील सानप यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांना पक्षात प्रवेश देऊन थंड करण्याचे काम झाल्याचे बोलले जात आहे. सानप यांच्याकडे संघटनेची जबाबदारी देताना इगतपुरी, देवळाली या विधानसभा मतदारसंघासह भगूर पालिकेत भाजपची सत्ता आणण्याची अवघड जबाबदारी दिली जाणार असल्याने एका अर्थाने त्यांच्यासाठी परीक्षाच राहणार आहे. 

मच्छिंद्र यांचे पुनर्वसन? 
मार्चमध्ये स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी पुढील महिन्यात सदस्यांची नियुक्ती केली जाईल. समितीवर सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र यांना स्थान देऊन सभापती करण्यासाठी गळ घातल्याचे बोलले जात आहे. परंतु सानप यांनी स्वतःहून पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाणार आहे. 

आमदारांमध्येही नाराजी 
 देवयानी फरांदे व सानप यांचे पूर्वीपासून वैर आहे. महापालिका निवडणुकीत मुलगी रश्‍मी यांची उमेदवारी कापल्याने आमदार हिरे यांची नाराजी आहे. ऐनवेळी पक्षात येऊन निवडणूक जिंकल्याने ढिकले व सानप एकमेकांचे स्पर्धक आहेत. ढिकले सोहळ्यास गैरहजर राहिले तरी फरांदे व हिरे पक्षाकडून कारवाईच्या भीतीने उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस मला जो आदेश देतील त्याचे पालन केले जाईल. वैयक्तिक कारणामुळे प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. 
- ॲड. राहुल ढिकले, आमदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com