भाजप नेते म्हणतात.. "पाच कोटी ज्याच्याकडे, त्यालाच सभापतीपदाची उमेदवारी?"

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

उमेदवारी देताना फक्त पैसा एवढीच गुणवत्ता आहे का, असा सवाल करताना महासभा, स्थायी समिती सभा, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा तसेच पक्षाच्या एकाही कार्यक्रमात सहभागी न झालेल्या व्यक्तीला सभापतिपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले जात असेल, तर सर्व तत्त्वनिष्ठेच्या फक्त गप्पा असल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक लढवायची असेल, तर पाच कोटी ज्याच्याकडे असेल त्यालाच उमेदवारी मिळेल, असा थेट प्रस्ताव भाजप सदस्यांना दिल्याने संतापात भर पडली. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांत मतभेदाच्या बातम्यांना पेव फुटले आहे. एका नेत्याने तर चक्क पाच कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा असे चर्चेत सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अहमदाबाद येथे सहलीला गेलेल्या सदस्यांमध्ये फूट पडल्याचे बोलले जाते.

फक्त पैसा एवढीच गुणवत्ता आहे का?

उमेदवारी देताना फक्त पैसा एवढीच गुणवत्ता आहे का, असा सवाल करताना महासभा, स्थायी समिती सभा, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा तसेच पक्षाच्या एकाही कार्यक्रमात सहभागी न झालेल्या व्यक्तीला सभापतिपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले जात असेल, तर सर्व तत्त्वनिष्ठेच्या फक्त गप्पा असल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

"हे" भाजपमध्ये पुन्हा केंद्रस्थानी
भाजपशी कुठलाही संबंध नसताना माजी मंत्री गिरीश महाजन यांचे हस्तक म्हणून महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करणारे नीलेश बोरा नावाचे व्यक्ती भाजपमध्ये पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत, असा आरोप होत आहे. अहमदाबाद येथे नगरसेवकांच्या हॉटेलमध्ये त्यांनी पोचण्याचा संबंध नसताना त्यांच्याकडून निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला जात असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. बोरा भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. महापालिकेत सत्ता आल्यापासून महापौरांच्या रामायण बंगल्यावर त्यांचा कायम वावर वादाचा विषय ठरला आहे. महापालिकेच्या काही कामांमध्ये ठेकेदार निश्‍चित करतानाही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याने आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना ओव्हरटेक करून सत्तेच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत बोरा यांचा वाढता हस्तक्षेप भाजपमधील खदखदीला कारणीभूत ठरत आहे.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP surfaced Election of the Chairman of the Standing Committee of the Municipality Nashik Political Marathi News