सोशल मिडियावर पोस्ट टाकताना नेटिझन स्वत:च होताएत सावधान..! हे आहे कारण.. 

social media 123.jpg
social media 123.jpg

नाशिक / येवला : सोशल मीडिया म्हणजे माहितीचे मायाजाल. मात्र लॉकडाउन काळात सोशल मीडिया अफवा पसरण्याचे साधन झाल्याने अनेकांना पहिल्यांदाच पोलिसी खाक्‍या पाहण्याची वेळ आली. सोशल माध्यमावर आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्ट्‌स, शेअर केल्याने जिल्ह्यातील 31 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर पोस्ट टाकताना भल्याभल्यांची गाळण होत असून, चारदा विचार करून पोस्ट टाकत असल्याचे चित्र सर्वत्र तयार झाले आहे. 

अफवा व आक्षेपार्ह पोस्टला लगाम
भारतात कोरोनामुळे लॉकडाउन सुरू होताच सुरवातीला अफवा पसरविल्या गेल्या. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा यंत्रणेकडून धडाकाच लावला गेल्याने आता अफवा व आक्षेपार्ह पोस्टला लगाम बसला आहे. राज्यात आतापर्यंत असे 524 गुन्हे दाखल होऊन 273 जणांना अटकदेखील झाली. नाशिक शहरात असे 13 व जिल्ह्यात 18 गुन्हे दाखल झाले आहेत. यासह 108 पोस्ट सोशल मीडियावरून काढूनदेखील टाकण्यात आल्या आहेत. 

व्हॉट्‌सऍप ग्रुपचे ऍडमिनदेखील पोलिसांच्या रडारवर
कोण काय संदेश तयार करेल आणि सोशल मीडियावर पोस्ट करेल यावर कोणाचेच बंधन नसते. त्यामुळे अल्पावधीत अफवा पसरण्याचे हा एक प्लॅटफॉर्म झाल्याने लॉकडाउन काळात सुरवातीला अनेक अफवा फुटल्या होत्या. रुग्णांची नावे जाहीर करण्यापासून तर उपचार, मृत्यू, बंद आदींबाबत चित्रविचित्र संदेश पोस्ट झाल्याने प्रशासनाने कठोर होत थेट कारवाईचा बडगा उगारला. म्हणता म्हणता अनेक पोस्ट टाकणारे नेटिझन आणि विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपचे ऍडमिनदेखील पोलिसांच्या रडारवर आले. अनेकांची यातून बदनामीही झाल्याने त्याचा परिणाम दिसून आला आणि सोशल मीडियावरील अफवा पसरविण्याचे लोण आता खूप कमी झाले आहे. 
 
मोहाला बळी पडू नका..! 
विविध मेसेजद्वारे मोबाईल रिचार्जसाठी, वेब सीरिजचे सबस्क्रिप्शन, बक्षीस मिळेल... त्यासाठी खालील लिंकवर क्‍लिक करा, असा मजकूर असतो. या लिंक्‍स व मेसेजेस ही सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे. असे विविध फंडे वापरून बॅंक अकाउंट्‌सचे सर्व डिटेल्स, पासवर्डस, डेबिट, क्रेडिट कार्डसची माहिती, पिन क्रमांक सर्व विचारले जाते व तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मोहाला बळी पडू, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. 

आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्यांवर राज्यात आतापर्यंत दाखल गुन्हे 

व्हॉट्‌सऍप 198 गुन्हे 
फेसबुक पोस्ट्‌स 219 गुन्हे दाखल 
टिक टॉक व्हिडिओ 28 गुन्हे दाखल 
आक्षेपार्ह ट्विट 12 गुन्हे दाखल 
इन्स्टाग्राम 4 गुन्हे 
अन्य सोशल मीडिया 61 गुन्हे दाखल 

जबाबदारीचे भान प्रत्येकाने राखावे

सोशल मीडियावर व्यक्त होताना आपल्या पोस्टमुळे समाजामध्ये भीती निर्माण करणारी, आपली माहिती अफवा पसरवणारी, तिरस्काराने पसरवली असेल तर आपल्यावर कायद्याने गुन्हा दाखल होतो. आपल्या पोस्टमुळे कुठलाही वादाचा व कायदेशीर प्रश्‍न निर्माण होऊ देऊ नका. सोशल मीडिया वापरताना सारासार विचार करावा व जबाबदारीचे भान प्रत्येकाने राखावे. -युवराज चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, येवला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com