"सत्ताधाऱ्यांनी आपसात लढण्याऐवजी कोरोना संसर्गाशी लढा द्यावा" - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 8 July 2020

शहरात विविध यंत्रणांमध्ये चांगला समन्वय साधला गेला. प्रारंभी मोठ्या प्रमाणात रूग्ण व मृत्यूही वाढले होते. शहर आता चांगले स्थिरावले आहे. नव्याने रुग्णसंख्या वाढणार नाही याची खबरदारी घेतानाच काँन्टँक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढवायला हव्यात. सत्ताधाऱ्यांनी आपसात लढण्याऐवजी कोरोना संसर्गाशी लढा द्यावा असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.८) येथे सांगितले.

मालेगाव : शहरात विविध यंत्रणांमध्ये चांगला समन्वय साधला गेला. प्रारंभी मोठ्या प्रमाणात रूग्ण व मृत्यूही वाढले होते. शहर आता चांगले स्थिरावले आहे. नव्याने रुग्णसंख्या वाढणार नाही याची खबरदारी घेतानाच काँन्टँक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढवायला हव्यात. सत्ताधाऱ्यांनी आपसात लढण्याऐवजी कोरोना संसर्गाशी लढा द्यावा असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.८) येथे सांगितले.

सर्व यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने रुग्णसंख्या आटोक्यात
उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात येथील कोरोना संसर्ग आढावा घेण्यासाठी येथे आले असता मसगा महाविद्यालय आवारात पत्रकारांशी ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, भारती पवार, आमदार राहुल आहेर या वेळी उपस्थित हाेते. श्री. फडणवीस म्हणाले, की शहर सुरवातीला हॉटस्पॉट ठरले होते. या काळात रुग्ण संख्येबरोबरच मृत्युदर वाढला होता. चाचण्या झाल्या नसल्या तरी या काळातील मृत्यू कोरोनामुळे झाले असावेत. येथील परिस्थिती व उपाययोजनांचा मी आढावा घेतला. मनपा, पोलिस व आरोग्य प्रशासनाने प्रेझेंटेशनही दिले. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली. मालेगाव पॅटर्न काय आहे हे नेमके मला माहित नाही. मात्र रुग्णसंख्या वाढू नये यासाठी खबरदारी घ्या. प्रशासनाने यासाठी तयारी केल्याचे सांगितले. आपण रूग्णांची पाहणी केली. येथे भारतीय जैन संघटनेसह विविध स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांनी मदत केली. त्याचाही परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी हातभार लागला. आम्हाला दबाव व भितीचे राजकारण करण्याची गरज नाही. याउलट सत्ताधारींनी आपसात लढण्याऐवजी कोरोना विरोधात लढा द्यावा. वाढीव वीजबीलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. वीजबील कमी करुन त्यासाठी हप्ते करुन दिले पाहिजे. येथील महापालिका, पोलिस व महसूल प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मसगा कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची त्यांनी चौकशी केली.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैसी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या येथील दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैसी झाली. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही याबद्दल खेद व्यक्त केला. गर्दी पाहून श्री. महाजन आढाव बैठक व श्री. फडणवीस पत्रकारांशी संवाद साधत असताना महाविद्यालयाच्या आवारात भ्रमणध्वनीवर बोलत शतपावली करीत होते. पोलिस व अधिकारीही मोजके कार्यकर्ते असूनही सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने त्रस्त झाले होते.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मनपा गटनेते सुनील गायकवाड, शहराध्यक्ष मदन गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, मनिषा पवार, जे. डी. हिरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, लकी गिल, दीपक पवार, दादा जाधव, पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, सदस्य अरुण पाटील, संजय निकम, उमाकांत कदम, नितीन पोफळे, सुनील चौधरी, पोपट लोंढे, दीपक गायकवाड, मंजुषा कजवाडकर, हरिप्रसाद गुप्ता, नाना मराठे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते, महसूल, पोलिस, महापालिका व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis at malegaon nashik marathi news