नाशिक विभागात लाखभर शेतकऱ्यांना परतीचा फटका; पिकांचे पंचनामे संथगतीने  

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 23 October 2020

नाशिक विभागात १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसामुळे एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या शेतात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. शासनकडून मात्र सध्या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. 

नाशिक : नाशिक विभागात १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसामुळे एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या शेतात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. शासनकडून मात्र सध्या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. 

लाखभर शेतकऱ्यांना परतीचा पटका 

१ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पीक व फळपिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सध्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महसूल विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात १९ हजार ७३७, धुळे जिल्ह्यात २७९, नंदुरबार जिल्ह्यात शून्य, जळगाव जिल्ह्यात ३७९, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात ८८ हजार १६२ शेतकऱ्यांच्या शेती पिकांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. 
नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, सटाणा, नांदगाव, कळवण, येवला, त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, दिंडोरी, निफाड, सिन्नर, चांदवड, सुरगाणा व नाशिक या तालुक्यांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर, तर जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर, चोपडा व यावल या तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा, संगमनेर, अकोला, श्रीरामपूर, पाथर्डी, कर्जत, शेवगाव, राहुरी, राहता व कोपरगाव या तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. 

कृषी कर्मचाऱ्यांना शासनाने कडक समज देण्याची गरज
विभागात भात, मका, नागली, वरई, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, कांदा व कांदा रोपे, टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे, केळी, पपई, ज्वारी, ऊस, मिरची, भात या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 
महाराष्ट्रभर पिकांचे पंचनामे सुरू असताना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आकडेवारी आणि बाधित क्षेत्र निरंक दाखवत आहे. याचा अर्थ नंदुरबार जिल्ह्यात योग्य रीतीने पिकांचे पंचनामे होत नाहीत म्हणून या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्यापासून तर पंचनामा करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना शासनाने कडक समज देण्याची गरज आहे. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

जिल्हा बाधित क्षेत्र (कंसात शेतकरीसंख्या) 
१. नाशिक----- १४५३८.८५ हे (१९७३७) 
२. धुळे--------२०४.०० हे (२७९) 
३. नंदुरबार-----निरंक (निरंक) 
४. जळगाव----२६५.६५(३७९) 
५. नगर--९५४२२.०५ (८८१६२) 
एकूण : ११०४३०. ५५ हेक्टर, बाधित शेतकरीसंख्या : १०८५५७ 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain damage for farmers in Nashik division marathi news