आई अन बहिणीच्या प्रेरणेने हरवले परिस्थितीला! वडिलांचे छत्र हरवलेल्या पार्थची स्वप्नपूर्ती

YEO20A01226_pr.jpg
YEO20A01226_pr.jpg

नाशिक / येवला : नात्यांचा गुंता मोठा भावनिक असतो. कधी कुणाला काय रोल निभवावा लागेल याचा नेम नसतो. असेच बहिण-भावाचे भावनिक नाते अन त्यातून मिळालेली फलश्रुतीची यशोगाथा नक्कीच कौतुकास्पद ठरली आहे. 


यशामागे खूप मोठं दुःख 
येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील इंग्रजी माध्यमात पार्थ उदय मानेकर ९१.६० टक्के मिळवून विद्यालयात पहिला आला. या स्वप्नपूर्तीसाठी आई अन बहिणीने दिलेली प्रेरणाच कारणीभूत ठरली असून या यशामागे खूप मोठं दुःख, दडपण, मेहनत अन् आत्मविश्‍वासाचं गमक दडलंय! दहावीचा निकाल जाहीर झाला असून टक्केवारीच्या गर्दीत वडीलांच्या आनंदाला मुकलेले काही गुणवंत आपलं यश हलकेच दाबून धरत मार्गक्रमण करताहेत. येथील पार्थच्या यशाचीही अशीच कहाणी आहे. 


आजोबा - पिताश्रींना श्रद्धांजली 
वडील उदय मानेकर यांचे ह्दयविकाराने निधन झालेले. यामुळे आईच्या पाठिंब्याने उच्चशिक्षित बहिण अंकीता आपल्या भावासाठी आधारवड झाली. परिस्थिती समजून घेत आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचेच या एकाच ध्येयानं त्याला पछाडलं होतं. ‘मी ज्या शाळेत शिकतो आहे, त्याच शाळेचे दोन दशकांहून अधिक काळ असलेले आपले आजोबा कै. आर. जी. मानेकर प्राचार्य होते. आपल्या आजोबांनी इंग्रजी विषय शिकवत अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण धवल यशाची परंपरा कायम राखूया’ असा संकल्प करीत आजोबा आणि पिताश्री यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूनं पार्थ हे नाव साकार केले. 


डोळयांच्या कडा पाणावल्या 
महाभारतातील पार्थ अर्थात अर्जून आणि त्याचा सारथी झाला साक्षात भगवंत श्रीकृष्ण...! मानेकरांच्या घरातील पार्थच्या सारथी झाल्या त्याच्या भगिनी अंकिता. पार्थ दहावीच्या परीक्षेत यंदा अव्वल ठरला असून त्याला अजून खूप शिकायचे आहे. जरी परिस्थिती नाजूक असली तरी त्याच्यासाठी मी कष्टाचे पराकाष्ठा करेन, अशी सार्थ आत्मविश्‍वासाची हाक देणारी बहिण पाठिशी आहे. पार्थने त्याचे पहिला येण्याचे यश बहिणीला रक्षाबंधनाची भेट दिल्याची प्रतिक्रया व्यक्त केली. हे ऐकताच उपस्थित सर्वांच्या डोळयांच्या कडा पाणावल्या. पार्थला प्राचार्य विकास पानपाटील, विजय भावसार व शिक्षकांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. 


पार्थच्या यशाचा सार्थ अभिमान 
पार्थ मानेकर हा आमच्या टिळक मैदानावरील हिरा आहे. खेळणे, बोलणे आणि सहभागी होणे या त्याच्या गुणांमुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याची बहिण अंकिता व आईच्या प्रोत्साहनातून त्याने हे घवघवीत सुयश संपादन केले. आम्हाला त्याच्या यशाचा अभिमान असल्याचे येवला येथील सोनी पैठणीचे संचालक निशांत सोनी यांनी म्हटले आहे. 

रिपोर्ट - संतोष विंचू

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com