दिलासादायक! नाशिक जिल्हावासीयांसाठी सोमवार ठरला सुखद! काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अशा पार्श्‍वभूमीवर सोमवार (ता. 20) मात्र जिल्हावासीयांसाठी सुखद ठरला.  दुसरीकडे शहरातील पहिला व जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्णही कोरोनामुक्त झाल्याने आरोग्य विभागाचे मनोधैर्य वाढले आहे. 

नाशिक : गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अशा पार्श्‍वभूमीवर सोमवार (ता. 20) मात्र दिवसभरातील 124 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी सुखद ठरला. यात मालेगावच्या 75 रिपोर्टचा समावेश आहे. दुसरीकडे शहरातील पहिला व जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्णही कोरोनामुक्त झाल्याने आरोग्य विभागाचे मनोधैर्य वाढले आहे. 

दिवसभरात 124 रिपोर्ट निगेटिव्ह; दोघे कोरोनामुक्त 
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत नाशिकमध्ये अंबडच्या संजीवनगर आणि मालेगावमधील कोरोना संशयित रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एकदम 99 झाली. त्यामुळे आरोग्य विभागावर ताण वाढला होता. मात्र, सोमवारी दिवसभरात प्रयोगशाळेकडून मालेगाव सामान्य रुग्णालयातील 75, उर्वरित जिल्ह्यातील 38 आणि जिल्हा रुग्णालयातील 10 व खासगी रुग्णालयात एक अशा 124 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला. त्याच वेळी जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला असून, त्यास जिल्हा रुग्णालयातून निरोप देण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेचे मनोधैर्य वाढले आहे. 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?
 
मालेगावमधील चौघांच्या दुसऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा 
मालेगावमध्ये 8 एप्रिलला पाच जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. यातील एकाचा रिपोर्ट येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. उर्वरित चौघांचे उपचारानंतरचे दुसरे स्वॅब प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर तिसरे स्वॅब सोमवारी रात्री पाठविण्यात आले. हे दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आल्यास चौघेही कोरोनामुक्त होतील आणि ही बाब मालेगावकरांसाठी मोठी दिलासादायक असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या स्वॅबच्या रिपोर्टची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! शाळेला सुट्टया म्हणून तलावाकडे गेलेल्या चिमुरड्याची आली अशी बातमी..कुटुंबियांचा आक्रोश

जिल्ह्यातील सद्यःस्थिती 
* एकूण कोरोनाबाधित : 99 (मालेगाव- 85, नाशिक शहर- 10, उर्वरित जिल्हा- 4) 
* उपचार सुरू : 89 
* एकूण मृत्यू : 8 (धुळे येथील तरुणीसह) 
* कोरोनमुक्त : 2 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monday was pleasant for Nashik district residents nashik marathi news