छगन भुजबळांच्या निवासस्थानाचा परिसर सील! 'हे' आहे कारण..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

या परिसरातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने राज्यातील बहुतांश मंत्री आपल्या गृहजिल्ह्यात थांबून उपाययोजना व नियोजन करण्यात व्यस्त आहेत. भुजबळ देखील येथूनच प्रशासनाशी समन्वय करतात. काल(ता.६) ते मुंबईला गेल्याने आज येथे नाहीत. मात्र त्यांना रोज शेकडो नागरीक भेटतात. यापुढे त्यांना याविषयी जागरुक राहावे लागणार आहे.

नाशिक :  भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यानंतर मनोहर नगर, गोविंदनगरपासून तीन किमी परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी या परिसराला भेट दिली असून मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारीही सोमवारी (ता.६) उपस्थित होते. या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

परिसर सॅनीटाईझ करण्याचे काम सुरु

नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील संशयीत रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. अनेक हाय प्रोफाईल नागरीकांचे वास्तव्य या भागात असल्याने प्रशासन सजग झाले आहे. काल (ता.६) रात्रीपासून हा परिसर सॅनीटाईझ करण्याचे काम सुरु झाले आहे. सुमंगल सोसायटी, मनोहर नगर, गोविंदनगर परिसरात कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुमंगल सोसायटीच्या त्रिज्यापासून तीन किलोमीटरचा परिसर पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधित केला आहे. आज सकाळी या भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले. आरोग्य विभाग तसेच महापालिककडून हा परिसर सॅनीटाईझ करण्याचे काम सुरु झाले आहे. या परिसरातील सर्व दुकाने तसेच अन्य संस्थाही बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. नाशिक जिल्ह्यातील दुसरा व शहरातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण येथे आढळल्याने प्रशासन सजग झाले आहे.

याच भागात अनेक पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य
या परिसरातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने राज्यातील बहुतांश मंत्री आपल्या गृहजिल्ह्यात थांबून उपाययोजना व नियोजन करण्यात व्यस्त आहेत. भुजबळ देखील येथूनच प्रशासनाशी समन्वय करतात. काल ते मुंबईला गेल्याने आज येथे नाहीत. मात्र त्यांना रोज शेकडो नागरीक भेटतात. यापुढे त्यांना याविषयी जागरुक रहावे लागणार आहे. याच भागात शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे, कल्पना चुंभळे यांचे देखील निवासस्थान आहे. कालच्या घटनेनंतर पोलिसांनी भुजबळ फार्मवरील बंदोबस्त वाढवला असून अनावश्यक गर्दी नियंत्रीत केली आहे.
दहा दिवसांपूर्वी लासलगाव परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर, सोमवारी (ता. 6) आणखी एका रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित 44 वर्षीय रुग्ण गेल्या 22 मार्चला आग्रा येथून प्रवास करून मनमाडमार्गे नाशिकमध्ये आला होता. उत्तर भारतातून आलेल्या प्रवाशांच्या यादीत नाव असल्याने पोलिसांनी त्यास गेल्या शनिवारी (ता. 4) ताब्यात घेऊन महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, तपासणीसाठी पाठविल्यानंतर प्रलंबित असलेल्या 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असून, आणखी 13 रिपोर्ट प्रलंबित आहेत.

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला संबंधित रुग्ण मनोहरनगर, गोविंदनगर परिसरातील रहिवासी असून, रेल्वेचा ठेकेदार आहे. तो कामानिमित्त आग्रा येथे गेला होता. 22 मार्चला त्याने आग्रा ते मनमाड व तेथून नाशिक रोड असा रेल्वेप्रवास केल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या शनिवारीच स्वॅबचे नमुने धुळ्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते; परंतु तेथील कोरोना तपासणी किट संपल्याने तेथून सर्व नमुने परत नाशिकला व रविवारी एकूण 35 नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट सोमवारी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णास आता जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seal of premises of Chhagan Bhujbal due to corona patient found in nashik marathi news