VIDEO : सावित्रीच्या लेकींचा मुखाग्नीसह अंत्ययात्रेत खांदा..! ह्रदय हेलावणारी गोष्ट..

tanishka help for grandmother.jpg
tanishka help for grandmother.jpg

नाशिक (कळवण) : देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने ती आधार शोधत होती. त्यातच तिने थेट वणीच्या पायथ्याशी असलेल्या मानूर गावात पाऊल टाकले... गावात आलेल्या ताईबाई शिंदे यांना गावात आधार देतानाच मुलींची जबाबदारी पार पाडली. तनिष्का गटप्रमुख लता पवार आणि अन्य सदस्यांनी तिला आधार देत मुलगी म्हणून जबाबदारी स्वीकारली... मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आई आणि मुलींच्या नात्याला गुरुवारी (ता.20) पूर्णविराम दिला तो आजींच्या अखेरच्या श्‍वासाने. 

नव्या बदलाच्या प्रवाहाचे उदाहरण​

मूळच्या चांदवड तालुक्‍यातील काजीसांगवी येथील ताईबाई यांच्या कुटुंबात सांभाळ करण्यासाठी कोणीही नाही. ताईबाई यांचे भाऊही आयुष्याच्या मावळतीकडे झुकलेले... तनिष्का गटप्रमुख लता पवार आणि तनिष्का सदस्यांनी आजींचा आधार होतानाच मायेच्या आधाराने कुटुंबातील सदस्य म्हणून रमल्या होत्या. आजी गावात आल्या त्या वेळी त्या अर्धमेल्या अवस्थेतच होत्या. तनिष्का सदस्यांनी आपल्या आईला जीव लावतानाच माणुसकीचा एक आदर्श पाठच जगासमोर ठेवला आहे. सावित्रीच्या लेकी होत त्यांनी भक्कम आधार दिला. ताईबाईंच्या शेवटच्या श्‍वासाने सावित्रीच्या लेकींचा हुंकार मोकळा झाला... आजीने या जगाचा निरोप घेतला... केवळ कळवण तालुक्‍यातच नव्हे, तर पुरोगामी महाराष्ट्रात तनिष्कांनी दिलेला बदलाचा आदर्श नक्कीच नव्या बदलाच्या प्रवाहाचे उदाहरण ठरले आहे. 

खांदा देण्यापासून ते पाणी देण्याची जबाबदारी तनिष्कांनी पार पाडली.

आजींच्या अंत्यसंस्कारासाठी खांदा देण्यापासून ते पाणी देण्याची जबाबदारी आज तनिष्कांनी पार पाडली. ताईबाई शिंदे यांच्या अंत्यविधीसाठी तहसीलदार बी. ए. कापसे, तनिष्का गटप्रमुख लताबाई पवार, उपसरपंच लतिका पवार, हेमलता पवार, अश्‍विनी पवार, मीना महिरे, रेखा जाधव, सगुणा खैरनार, कोमल बोरसे, मनीषा पवार, ताई पवार, नबाबाई आंबेकर, वर्षा सावळे, वंदना माळी, पुष्पा पवार, कल्पना बोरसे, शेभाबाई पवार, कविता अहिरे, ज्योती चव्हाण, कुसुम गांगुर्डे, चंद्रकला मुसळे, अरुणा आहेर आदी तनिष्का उपस्थित होत्या. 

तनिष्का व्यासपीठाने दिलेल्या सामाजिक बदलाच्या शिकवणुकीतून आम्ही ताईबाई यांच्यासाठी लेकी झालो. सामाजिक कार्यात पुढे जातानाच सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे मोठा समाधान मुलगी म्हणून मला मिळालंय. तनिष्का असल्याचा अभिमान वाटतो. - लताबाई पवार, गटप्रमुख 
 

तनिष्का सदस्यांनी केवळ ताईबाई यांचा सांभाळच केला नाही, तर सावित्रीच्या लेकी म्हणून घालवून दिलेला आदर्श निश्‍चितच राज्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे. समाजातील माणुसकी अजूनही अबाधित आहे. तनिष्का सदस्यांचे अभिनंदन. - बी. ए. कापसे, तहसीलदार 
 

मानूरमध्ये ताईबाई या ज्या परिस्थितीत आल्या, तेव्हा त्यांची अवस्था खूप बिकट होती. हातापायात त्राण नसताना तनिष्का तसेच ग्रामस्थांनी दिलेल्या आधारातून ताईबाई यांनी आयुष्यात उभारी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीने त्यांना आज हिरावून नेले. तनिष्का सदस्यांनी केलेली सेवा निश्‍चितच अभिमानास्पद आहे. - अभिजित पवार, युवा नेते 
 

"सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठाच्या निमित्ताने निश्‍चितच महिलांनी सावित्रीच्या लेकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आयुष्यात मावळतीकडे झुकलेल्या भगिनीला केवळ खांदा देणेच नाही, तर तिला मुखाग्नी देत दिलेला आधार खूप मोठा आहे. - जितेंद्र कापडणे, रोटरी क्‍लब, कळवण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com