अनेक बळी घेऊनही चौपदरीकरणाचे काम ठप्पच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फागणे- तरसोद टप्प्यातील काम पूर्णपणे ठप्प झालेय. दोन आठवड्यांपूर्वीच मक्तेदार एजन्सीकडून काम झपाट्याने होत असून, अडीचशे- तीनशे कामगार कामावर असल्याचा केलेला दावा साफ खोटा ठरला आहे.

जळगाव : वाहनधारकांच्या रोजच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फागणे- तरसोद टप्प्यातील काम पूर्णपणे ठप्प झालेय. दोन आठवड्यांपूर्वीच मक्तेदार एजन्सीकडून काम झपाट्याने होत असून, अडीचशे- तीनशे कामगार कामावर असल्याचा केलेला दावा साफ खोटा ठरला आहे. "सकाळ'च्या ग्राउंड रिपोर्टमधून या जवळपास 84 किलोमीटर टप्प्यातील कामावर चार-पाच ठिकाणी मशिनरी तर उभी आहे, मात्र ती बंद अवस्थेत असून, एक-दोन ठिकाणी आठ- दहा कामगारांच्या पलीकडे कुणी नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघातांची मालिका सुरू असून, गेल्या महिनाभरात पंधरापेक्षा अधिक बळी एकट्या जळगाव- धुळे मार्गावर गेले आहेत. रखडलेले चौपदरीकरण, साईडपट्ट्या व खड्ड्यांनी झालेली दुरवस्था यामुळे निष्पाप वाहनधारकांचे बळी जात असताना महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. चौपदरीकरणाचे काम ज्या आग्रोह इन्फ्रास्ट्रक्‍चरला देण्यात आले आहे, त्या एजन्सीने दीड वर्षापासून काम सुरू केले असले तरी ते अत्यंत कासवगतीने होत असून, अद्याप अवघे दहा टक्के कामही पूर्ण झालेले नाही. 

आर्वजून पहा :पालकमंत्र्यांचा तरुणांना अजब सल्ला.. म्हणाले, परमिट रुम ...
 

पाठपुरावाही ठरला अपयशी 
रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत प्रसारमाध्यमे तसेच लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही या कामाने गती घेतलेली नाही. त्यामुळे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. खासदार उन्मेष पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी मक्तेदाराला दम भरला, गेल्या आठवड्यात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीतही त्यावर आक्रमक चर्चा झाली. मात्र, त्याचा या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही. 

मक्तेदाराचा दावा ठरला खोटा 
पंधरा दिवसांपूर्वी मक्तेदार एजन्सीचे प्रकल्प अधिकारी मनीष कापडणे यांनी चौपदरीकरणाचे काम गतीने होत असून अडीच-तीनशे कामगार त्यावर कार्यरत असल्याचा दावा केला होता. पाळधी- एरंडोलदरम्यान सुरू असलेल्या कामाची छायाचित्रेही त्यांनी उपलब्ध करून दिलीत. मात्र, त्यासंदर्भात "सकाळ'ने आज प्रत्यक्ष पाळधी- एरंडोल व पुढे सारवे फाट्यापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली असता काम पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले. 

आणखी पाच वर्षे लागणार 
2012 पासून या कामाला ग्रहण लागले आहे, ते अद्याप सुटलेले नाही. या कामाबरोबरच सुरू झालेले तरसोद- चिखली टप्प्यातील काम झपाट्याने होत असून, ते जवळपास 60 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आणखी वर्षभरात ते शंभर टक्के पूर्ण होईल. तर या फागणे- तरसोदचे काम याच गतीने सुरू राहिले तर आणखी पाच- सहा वर्षे पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. 

हेपण पहा : आहो आश्‍चर्यच ना ! शेजारणीने दिला त्रास...अन्‌ बकरी पोहचली पोलिस ठाण्यात 
 

अशी होती स्थिती 
- मुसळी फाट्याजवळ : लेव्हल करण्याचे मोठे मशिन बंद अवस्थेत 
- पिंपळकोठ्याच्या अलीकडे : लेव्हल करण्याचे यंत्र, जेसीबी बंद स्थितीत 
- पिंपळकोठ्याच्या पुढे (एरंडोलकडे) : रस्ता सपाटीकरणाची बंद यंत्रणा 
- एरंडोलनजीक हॉटेल कृष्णासमोर : डांबरीकरणाची बंद पडलेली यंत्रणा 

दोन-तीन किलोमीटरचे डांबरीकरण 
फागणे- तरसोद या 84 किलोमीटरच्या टप्प्यात एरंडोल- पाळधीदरम्यान फक्त एरंडोल- पिंपळकोठा यादरम्यान दोन-तीन किलोमीटर भागात सध्याच्या महामार्गाला समांतर चौपदरीकरणाचे डांबरीकरण झाले आहे. उर्वरित संपूर्ण भागात सपाटीकरण, त्यावर मुरूम पसरविणे, खडीचे काही ठिकाणी असलेले थर या स्वरूपाचे काम दिसून येते. त्यापलीकडे जाऊन पूल, मोऱ्या, अंडरपास, बायपास असे कुठल्याही प्रकारचे काम दिसून आले नाही. 

नक्की पहा :पाच वर्षाची चिमुरडी ती...धावली, ओरडली अन्‌ बहिणीला वाचविले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news higway forway work stop and daly accidant