गिरणा परिसराला पाचव्या दिवशीही पावसाने झोडपले

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पिलखोड (ता. चाळीसगाव, जळगाव) : सलग पाचव्या दिवशीही बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेसातच्या सुमारास परतीच्या पावसाने गिरणा परिसराला झोडपले. यामुळे पिकांची वाईट अवस्था झाली असून, कापूस पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय चाळीसगाव शहरातही सायंकाळी पाचला पावसाने हजेरी लावली.

पिलखोड (ता. चाळीसगाव, जळगाव) : सलग पाचव्या दिवशीही बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेसातच्या सुमारास परतीच्या पावसाने गिरणा परिसराला झोडपले. यामुळे पिकांची वाईट अवस्था झाली असून, कापूस पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय चाळीसगाव शहरातही सायंकाळी पाचला पावसाने हजेरी लावली.

गिरणा परिसरातील पिलखोड, मेहुणबारे, मांदुर्णे, सायगाव, उपखेड, तामसवाडी आदी भागांत परतीच्या वादळी पावसाने झोडपले. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून थोड्याफार फरकाने परिरातल्या विविध गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्ध्यातासाहून जास्त वेळ जोरदार पाऊस बरसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच चार दिवस पाऊस झाल्याने पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आजच्या झालेल्या पावसामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

शनिवार (ता. 7) पासून परतीचा पाऊस पडतो आहे. बुधवारी सलग पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. कापसाचे जास्त नुकसान होत असून मका, बाजरी पिकांची देखील वाईट परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्य:स्थितीत मजुरांची कमतरता भासत असून देखील आपल्या कुटुंबाच्या मदतीने शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी तळमळ सुरू आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास कडक ऊन पडले होते. त्यात मागचा वेचणी केलेला कापूस व चालू वेचणी करीत असलेला कापूस वळविण्यासाठी ऊन्हात ठेवला होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे वळविण्यासाठी घातलेला कापूसही काही ठिकाणी ओला झाला आहे. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: jalgaon news rain in girna area